मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कबुतर हा पक्षी शांतीदूत म्हणून ओळखला जातो. हा देखणा पक्षी शांततेचे प्रतिक आहे. परंतु, या पक्षाने आता घराघरांमधील शांतता नष्ट केली आहे. हसत्या खेळत्या कुटुंबांमध्ये आजाराची बीजे रोवली आहेत. या पक्षाची विष्ठा, पिसे आणि इतर घाणीतून अत्यंत घातक असे संसर्ग पसरतात. अॅक्युट हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमोनाइटीस हा विकार बळावतो. त्यानंतर माणसाचे फुफ्फुस निकामी होतात. फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय पर्याय राहत नाही. रुग्णाला चोवीस तास ऑक्सिजनवर ठेवावे लागते. त्यामुळे कबुतर आता शांतीदूत राहिला नसून माणसांसाठी यमदुत झाल्याचे दिसून येत आहे. त्यातून यासंदर्भात पुढारीचे वाचक योगेश पराडकर यांनी अत्यंत हृदयद्रावक अनुभव सांगितला आहे.
पराडकर सांगतात, दोन आठवड्यांपूर्वी कबुतरामुळे झालेल्या विकारातून मी ठाण्यात राहणारा अगदी जवळचा मित्र गमावला.
पराडकर म्हणाले, की माझा मित्र राहत असलेल्या फ्लॅटच्या खिडकीखाली ग्रिलमध्ये एसी डक्ट युनिटच्या आजूबाजूला कबुतर राहत होते. एसीमधून जी हवा घरात येत होती त्यातून सुकलेल्या विष्ठेमधील सूक्ष्म जंतुयुक्त धूळ घरात जाईल, याची तीळमात्र कल्पना त्याच्या कुटुंबाला नव्हती. माझा मित्र जवळपास दोन महिने आजारी होता. त्याचे फुफ्फुस आणि श्वसनलिका पूर्णपणे बाधित झाली होती. त्याचे ६० टक्के फुफ्फुस निकामी झाले असून घराच्या खिडकीत असलेल्या कबुतरांमुळे हा आजार झाल्याचे टेस्टमध्ये सिद्ध झाले. फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु, फुफ्फुसेही मिळेनाशी झाली. यातच माझ्या मित्राचा मृत्यू झाला. कबुतर हा शांतीदुत नसून यमदूत आहे हे मित्राच्या मृत्यूने शाबीत केले आहे.