Latest

ओशियनोग्राफी क्षेत्राची करिअर वाट

Arun Patil

डॉक्टर, इंजिनिअर यांसारख्या करिअरच्या पारंपरिक पायवाटा चोखाळण्याऐवजी चाकोरीबाहेरची वाट धरू इच्छिणार्‍यांसाठी ओशियनोग्राफीचं क्षेत्र नक्कीच फायदेशीर ठरू शकेल. ओशियनोग्राफीमध्ये समुद्राशी निगडित विविध बाबींचा सखोल अभ्यास केला जातो. ओशियनोग्राफी क्षेत्रात पदवी मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सरकारी, खासगी संस्थांमध्ये शास्त्रज्ञ, इंजिनिअर, टेक्निशियन या पदांसाठी नेहमीच चांगली मागणी असल्याचे दिसते.

अथांग समुद्र सार्‍यांनाच अंतर्मुख करत असतो. समुद्राच्या किनार्‍यावर उभे राहिले की, निसर्गाच्या विशाल रूपाची अतिशय प्रकर्षाने जाणीव होते. आपल्या पोटात अगणित जीव घेऊन फेसाळणारा समुद्र अद्भूतच म्हटला पाहिजे. सागरातील जीवसृष्टीबद्दल मानवाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. कदाचित म्हणूनच समुद्र आणि त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करणे मानवासाठी नेहमीच आव्हान ठरले आहे. ओशियनोग्राफी या शाखेत समुद्रसंबंधीच्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला जातो. समुद्र आणि त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या विषयांची आवड असणार्‍यांसाठी या क्षेत्रातील कोणतीही उपशाखा निवडून करिअरची वेगळी वाट नक्कीच चोखाळता येईल. ओशियनोग्राफीच्या काही प्रमुख उपशाखा आहेत.

केमिकल ओशियनोग्राफी : या उपशाखेचा संबंध पाणी, पाण्यातील क्षार, रसायने, पाण्याचा दर्जा इत्यादी गोष्टींशी असतो. केमिकल ओशियनोग्राफीचे जॉब प्रोफाईल समुद्राशी निगडित रासायनिक घडामोडी, रासायनिक कंपाऊंड यांच्याभोवती फिरत असते. येथेे समुद्रातील मौल्यवान तत्त्व मिळवण्यासाठी काही तंत्र विकसित करणे, समुद्रातील रासायनिक प्रक्रियांच्या साहाय्याने किंवा त्यातील काही रासायनिक घटकांच्या साहाय्याने मानवोपयोगी घटक विकसित करणे हे प्रमुख उद्दिष्ट असते.

जियॉलॉजी : या शाखेमध्ये समुद्राचा आकार, त्यातील घटकांचे प्रकार जाणणे, किनार्‍यावरील स्तरांचा अभ्यास करणे, समुद्राच्या पोटात असणार्‍या उंच, सखल भागाचा अभ्यास करणे. थोडक्यात समुद्राच्या जियॉलॉजिकल आणि जियोफिजिकल वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे या शाखेत अंतर्भूत असते.

फिजिकल ओशियनोग्राफी : या शाखेंतर्गत महासागरातील तापमान, घनता, वेग, गती, इत्यादी गोष्टींचे संशोधन केले जाते. या घडामोडींच्यामागे असणार्‍या कारणांपर्यंत पोहोचायचे असते. येथे अभ्यासकाला समुद्र, जलवस्तू, ऋतू, हवामान यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अभ्यास करायचा असतो.

मरीन बायोलॉजी : या शाखेमध्ये समुद्राच्या वातावरणात, समुद्राच्या पाण्यात राहणार्‍या जीवन चक्रावर संशोधन करायचे असते. एक मरिन बायोलॉजिस्ट (समुद्र जीवशास्त्रतज्ज्ञ) समुद्र जीवांची निर्मिती प्रक्रिया कोण थांबवते, ती कशी सुरू असते याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.

मरीन ऑर्कियोलॉजिस्ट : या शाखेमध्ये समुद्राच्या पोटात दडलेल्या एखाद्या ऐतिहासिक संस्कृतीचा शोध घेणे, ज्यामध्ये एखादी इमारत, हत्यारे, भांडी, त्यांच्या काळातील राहाणीमानाशी निगडित सामान बाहेर काढणे, त्यावर संशोधन करणे यांचा अभ्यास केला जातो. या संशोधनामुळे काळाच्या आड दडलेल्या संस्कृतीचा शोध लागण्यास मदत होते.

ओशियनोग्राफीच्या क्षेत्रात

पदवी मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सरकारी, खासगी संस्थांमध्ये शास्त्रज्ञ, इंजिनिअर, टेक्निशियन या पदांसाठी नेहमीच चांगली मागणी असल्याचे दिसते. सर्व्हे ऑफ इंडिया आणि डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीशी जोडलेल्या कंपन्यादेखील या क्षेत्रात बर्‍याच संधी उपलब्ध करत असतात. त्यामुळे समुद्रासंबंधीच्या कोणत्याही विषयाची आवड असणार्‍यांना या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी आहेत.

वर्षा शुक्ल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT