ओवीकुश गांजा, एमडी व एलएसडी हे अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून बिबवेवाडी परिसरात पकडले. कुंदम गौतम कोकाटे (वय 23, रा. मुलूंड, मुंबई), तपन जितेंद्र पंडीत (वय 34, रा. धनकवडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
यावेळी त्यांच्याकडून आठ लाख तेरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोशल माध्यमांद्वारे हे दोघे ग्राहकांना अमली पदार्थ विकत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी दोघांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोकाटे हा बीकॉमचे शिक्षण घेत आहे. तर, पंडित हा पुण्यात फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. दोघांची सोशल मिडीयावरून ओळख झाली होती. कोकाटे हाच मुंबईवरून अमली पदार्थ घेऊन आला होता. दोघे मिळून सोशल मिडीया व ओळखीच्या व्यक्ती मार्फत अमली पदार्थ विक्री करत होते, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी दिली आहे.
तस्करीच्या अनुषंगाने अमली पदार्थ विरोधी पथक शहरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी मयुर सुर्यवंशी याला बिबवेवाडी भागात दोन व्यक्ती अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या पथकाने दोघांना पकडले. त्यांच्याकडून गांजा, एलएसडी, एमडी असे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ही कामगिरी पोलिस निरीक्षक खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण कर्मचारी संतोष देशपांडे, मयुर सुर्यवंशी,चेतन गायकवाड, योगेश मांढरे यांच्या पथकाने केली.
ओवीकुश गांजा हा फारच दुर्मीळ अमली पदार्थ आहे. डार्क वेबवर आभासी चलनामध्ये या गांजाचे व्यवहार चालतात. हायब्रीज प्रकारातील गांजा असून याची नशा वेगळीच असते. हिंदकुश पर्वतामध्ये हा गांजा मिळतो. त्याची नशा जास्त काळ टिकतो. त्यामुळे त्याची किंमत देखील जास्त आहे. एका ग्रॅमला अडीच ते तीन हजार रूपये आकारले जातात. त्यामुळे उच्चभ्रू नागरिकांमध्ये या गांजाला मागणी असते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी कोकाटे हा मुख्यसुत्रधार असून, तो जवळपास सर्व प्रकारच्या अमली पदार्थाची विक्री करतो. मुंबईतून हे अमली पदार्थ पुण्यात विक्रीसाठी घेऊन आला आहे. मुंबईतून तो कोणत्या तस्कराकडून हे पदार्थ घेऊन येतो त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.