कोरोनाच्या 'डेल्टा' संकटातून जग पुरते सावरलेले नाही, तोच 'ओमायक्रॉन' नावाच्या व्हेरियंटने जगाची धास्ती वाढविली आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम सापडलेल्या या व्हेरियंटने सध्या युरोप, अमेरिकेत खळबळ उडवली आहे. भारतातही या व्हेरियंटचे आतापर्यंत शंभरहून अधिक रुग्ण सापडले आहेत. डेल्टा व्हेरियंटला मागे टाकण्याची क्षमता ओमायक्रॉनमध्ये असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. यावरून या व्हेरियंटच्या संसर्गाची विलक्षण गती लक्षात येते.
ओमायक्रॉनला हलक्यात घेण्याची बिलकूल गरज नाही. कारण, डेल्टाच्या प्रसारापूर्वी जी बेफिकिरी आणि शिथिलता दाखविण्यात आली होती, त्याची कटू फळे देशवासीयांनी चालू वर्षाच्या सुरुवातीला भोगलेली आहेत. थोडक्यात, ओमायक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच केंद्र सरकार, राज्य सरकारे, आरोग्य व्यवस्था आणि फ्रंटलाईन वर्कर्सना आता सज्ज व्हावे लागणार आहे.
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिंयटने चालू वर्षाच्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत हाहाकार उडवला होता. देशातील दैनिक रुग्णसंख्या तीन लाखांच्या पुढे गेली होती, तर मृतांचा दैनिक आकडा हजारोंच्या घरात गेला होता. कठोर निर्बंध पाळून आणि लसीकरण मोहिमेला गती देऊन त्यावेळी कोरोना प्रसारावर नियंत्रण आणण्यात यश आले होते. सुदैवाने जून महिन्यापासून आतापर्यंत कोरोनाचा आलेख घसरता राहिलेला आहे.
देशातील दैनिक रुग्णसंख्या सध्या सहा ते सात हजारांच्या आसपास स्थिर आहे. दुसरीकडे मृतांचे प्रमाणही बर्यापैकी कमी झालेले आहे. कोरोना नियंत्रणात आल्याने अर्थव्यवस्थेची गाडी पूर्वपदावर आली आहे. नेमके अशावेळी नव्याने उद्भवलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट काळजी वाढवणारा ठरला आहे. ज्या पद्धतीने पहिल्या आणि दुसर्या लाटेचा सामना नागरिकांनी केला; त्याप्रमाणे तिसर्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आता आली आहे.
जगभरात ज्या गतीने ओमायक्रॉन व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत, ते पाहता हा व्हेरियंट साधासुधा नसल्याची जाणीव होते. त्याचमुळे कोरोनाने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. विशेषतः युरोप आणि अमेरिकेत हा व्हेरियंट वेगाने पसरत आहे. त्यातही युरोपमधील विक्रमी रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय आहे. एकट्या ब्रिटनमध्ये दैनिक रुग्णसंख्या 90 हजारांच्या आसपास गेली आहे. फ्रान्स, स्पेन हे देशही लॉकडाऊनच्या मार्गाकडे चालले आहेत. अमेरिकेत फार काही वेगळी परिस्थिती नाही.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चालू हिवाळ्यात देशाची स्थिती खराब होण्याची व रुग्णसंख्येत तसेच मृतांच्या संख्येत मोठी भर पडण्याची भीती व्यक्त केली आहे. युरोप, अमेरिकेतील स्थिती म्हणजे भारतासह जगासाठी एक प्रकारे धोक्याचा इशाराच आहे. भारताचा विचार केला, तर आतापर्यंत 11 राज्यांमध्ये ओमायक्रॉन स्ट्रेनचे रुग्ण सापडले आहेत. त्यातही सर्वाधिक रुग्णसंख्येसह महाराष्ट्र आघाडीवर आहे.
गतवर्षीच्या 20 डिसेंबर रोजी म्हणजे बरोबर वर्षभरापूर्वी डेल्टा व्हेरियंटची ओळख पटविण्यात आली होती. दुसरीकडे मागील नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ओमायक्रॉन व्हेरियंटची ओळख पटविण्यात आली होती. डेल्टा व्हेरियंटने प्रसाराच्या तीन महिन्यांनंतर हाहाकार माजविला होता. या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन जानेवारीच्या अखेरपासून मोठे नुकसान करू शकतो, असा अंदाज आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
यापासून वाचायचे असेल, तर आतापासूनच सामाजिक दूरत्व पाळणे, मास्क वापरणे, कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डेल्टापेक्षा 70 पट जास्त वेगाने हा व्हेरियंट पसरू शकतो आणि लस घेतलेल्यांनाही त्याची बाधा होऊ शकते, असे पाहणीत दिसून आले आहे. सुदैवाची एकच बाब ही की, डेल्टापेक्षा हा व्हेरियंट जास्त प्राणघातक नाही. ओमायक्रॉनचा प्रसाराचा वेग वाढला, तर डेल्टा रुग्णांच्या संख्येपेक्षा या व्हेरियंटच्या रुग्णांची संख्या भविष्यात जास्त होऊ शकते.
लखीमपूर प्रकरणाने तापली संसद…
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज अखेरच्या टप्प्यात आले असून येत्या गुरुवारपर्यंत अधिवेशन चालणार आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकर्यांच्या अंगावर गाडी गेल्याने त्यात काही शेतकर्यांचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष हा या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे.
आशीष मिश्रा याच्या जीपच्या ड्रायव्हरने शेतकर्यांच्या अंगावर जाणीवपूर्वक गाडी घातली होती, असे ताशेरे सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या एसआयटीने ओढले होते. त्यातच आशिष याच्यावरील आरोप सौम्य करण्याचा प्रयत्न अजय मिश्रा यांनी केला असल्याचा सांगत विरोधी पक्षांनी संसद डोक्यावर घेतली. गेल्या आठवड्यातले तीन दिवसांचे कामकाज अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पूर्णपणे वाया गेले.
संसद कामकाजाच्या उर्वरित चार दिवसांतही विरोधक या मुद्द्यावरून सरकारला भंडावून सोडल्याशिवाय राहणार नाहीत, हे स्पष्ट दिसून येत आहे. एकीकडे बारा खासदारांच्या निलंबनावरून काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी राज्यसभेत आक्रमक भूमिका घेतली आहे, तर कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत टेणी प्रकरण गाजत आहे. चालू हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याबाबतचे विधेयक मांडले जाणार होते.
याशिवाय ऊर्जा सुधारणा विधेयक मांडण्याचा सरकारचा विचार होता. उभय सदनांतील गोंधळाची स्थिती पाहिली, तर ही दोन्ही विधेयके सदनात येणार की नाहीत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टेणी प्रकरण एवढ्यात थांबणारे नसून उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीतदेखील हा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्याचा निर्धार विरोधकांनी केलेला आहे. शेतकरी आंदोलन संपले असले, तरी टेणी प्रकरणाच्या निमित्ताने शेतकर्यांच्या मनातला केंद्र सरकारविरुद्धचा अंगार धगधगता ठेवण्याचा विरोधकांचा प्रयत्न यातून दिसून येत आहे.