Latest

ऑस्कर पुरस्कार सोहळा : ऑस्कर विजेते सिनेमे

Arun Patil

सिनेक्षेत्रात प्रतिष्ठेेचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. सर्वाधिक ऑस्कर पुरस्कारांचा मानकरी 'ड्यून' ठरला असला, तरी सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार 'कोडा'ला मिळाला आहे. सर्वाधिक नामांकन मिळवूनही 'द पॉवर ऑफ द डॉग'ला एकच पुरस्कार मिळाला; जो बराच खास आहे.

लॉस एंजेलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये नुकताच 94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यात शान हेडरच्या 'कोडा'ला सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्याचबरोबर डुनी विल्नवच्या 'ड्यून'ने सर्वाधिक ऑस्कर पुरस्कारांवर आपली मोहर उमटवली.

'चाईल्ड ऑफ डीफ अडल्टस्' किंवा 'कोडा' म्हणजे प्रौढ मूकबधिरांचं मूल. सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि सर्वोत्कृष्ट आधारित पटकथेचा पुरस्कार मिळवणार्‍या या सिनेमात दिग्दर्शिका शान हेडर यांनी मासेमारीचा व्यवसाय करणार्‍या रॉसी कुटुंबाची कथा दाखवली आहे. रुबी रॉसी वगळता तिचे आई-वडील फ्रँक आणि जॉकी, तसंच भाऊ लियो मूकबधिर आहेत. रुबीच या कुटुंबाचा आवाज आहे. रुबीला शाळेत तिच्या घरच्यांच्या या व्यंगावरून वारंवार हिणवलं जात असतं.

रुबीच्या शाळेतले संगीत शिक्षक मिस्टर वी तिच्या आवाजावर प्रभावित होऊन तिला बर्क्ली कॉलेज ऑफ म्युझिकला प्रवेश घेण्याचा सल्ला देतात. इकडे स्थानिक प्रशासनाच्या जाचक अटींना कंटाळून रॉसी कुटुंब स्वतःची मासेमारी कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतं. पण त्यासाठी त्यांना रुबीची मदत हवी असते. यामुळे घरगुती व्यवसाय आणि गायन प्रशिक्षण अशा अनुक्रमे गरज आणि स्वप्नाच्या दोन्ही आघाड्या सांभाळताना रुबीची तारांबळ उडते. यात रुबी कुटुंबाला महत्त्व देते की, तिच्या स्वप्नांना याचं उत्तर आपल्याला 'कोडा' देतो.

'कोडा'मध्ये रुबीच्या घरच्यांची भूमिका साकारणारे कलाकार खर्‍या आयुष्यातही कर्णबधिरच आहेत. त्यामुळे अभिनयाच्या बाबतीत 'कोडा' बराच उजवा ठरला आहे. यात साईन लँग्वेजचा वापर अतिशय प्रभावीपणे केला गेलाय. शारीरिक व्यंग असणार्‍या लोकांचं नेहमीचं निरस, उदासवाणं चित्रण टाळून त्यांचं नॉर्मल जगणं दाखवल्याने बहुतांश प्रेक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारासाठी 'कोडा'चं नाव घोषित झाल्यावर संपूर्ण सभागृहाने उभं राहून साईन लँग्वेजद्वारे यातल्या कलाकारांना मानवंदना दिली.

'कोडा' हा असा पहिलाच ऑस्करविजेता सिनेमा आहे, ज्यात मध्यवर्ती पात्रांची भूमिका खर्‍याखुर्‍या मूकबधिर कलाकारांनी केलीय. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रीलिज होऊन ऑस्कर मिळवण्याचा पहिला मानही 'कोडा'नेच मिळवला आहे. त्याचबरोबर रुबीच्या वडिलांची भूमिका साकारणारे आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणारे ट्रॉय कॉत्सर हे ऑस्कर मिळवणारे पहिले पुरुष मूकबधिर कलाकार ठरलेत.

डुनी विल्नवच्या 'ड्यून'ने तांत्रिक विभागात दिमाखदार कामगिरी करत तब्बल सहा ऑस्कर पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. या सिनेमात राजकीय सत्तासंघर्ष मांडला गेलाय. ऐतिहासिक कालखंडात घडणार्‍या राजकीय पटाला हाय-फाय जॉनरची फोडणी दिल्याने हा सिनेमा अधिक मनोरंजक ठरला आहे. आपल्या भव्यदिव्य मांडणीमुळे हा सिनेमा सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय बनला.

सर्वोत्कृष्ट संगीत, एडिटिंग, प्रॉडक्शन डिझाईन, सिनेमेटोग्राफी, साऊंड आणि व्हीएफएक्स अशा सहा पुरस्कारांवर मोहर उमटवणार्‍या 'ड्यून'ला यावर्षी एकूण 10 ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकित केलं गेलं होतं. प्रथितयश संगीतकार हांस झिमर यांनी 'ड्यून'ला पार्श्वसंगीत दिलं असून, 1994 च्या 'द लायन किंग'नंतर त्यांचा हा दुसरा ऑस्कर पुरस्कार आहे. जेन कॅम्पियन दिग्दर्शित 'द पॉवर ऑफ द डॉग' हा यावर्षीचा सर्वाधिक ऑस्कर नामांकन मिळवणारा सिनेमा ठरला.

तब्बल बारा नामांकने मिळालेला हा सिनेमा फक्त सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाच्याच पुरस्काराचाच मानकरी ठरला. सायकोलॉजिकल ड्रामा असलेला हा सिनेमा राग, दुःख, प्रेम, ईर्ष्येसारख्या मानवी भावभावनांवर आणि लैंगिकतेच्या वेगळेपणावर भाष्य करतो सर्वोत्कृष्ट पटकथेचा ऑस्कर मिळवणार्‍या 1993 च्या 'द पियानो'नंतर कॅम्पियन यांचा हा दुसरा ऑस्कर पुरस्कार ठरला. 'द पॉवर ऑफ द डॉग'मुळे एकापेक्षा जास्त ऑस्कर नामांकन मिळवणारी पहिली दिग्दर्शिका बनण्याचा मान कॅम्पियन यांना मिळालाय.

मिशेल शोवाल्टर दिग्दर्शित 'द आईज ऑफ टॅमी फे'ला सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषेचा ऑस्कर मिळाला. त्याचबरोबर, यात मुख्य भूमिका साकारणार्‍या जेसिका चास्टेनला सर्वोत्कृष्ट नायिका म्हणून गौरवण्यात आलं. ऑस्कर सोहळ्यात आपल्या पत्नीवर विनोद करणार्‍या ख्रिस रॉकला मारल्यामुळे चर्चेत आलेल्या विल स्मिथला 'किंग रिचर्ड'साठी सर्वोत्कृष्ट नायकाचा ऑस्कर मिळाला. 'रायटिंग विथ फायर' ही ऑस्कर नामांकन मिळवलेली पहिली भारतीय डॉक्युमेंटरी ऑस्कर मिळवण्यात अपयशी ठरली. तिच्याऐवजी 'समर ऑफ सोल'ला सर्वोत्कृष्ट ऑस्कर डॉक्युमेंटरीचा ऑस्कर मिळाला.

रुसुके हामागुची यांच्या 'ड्राईव्ह माय कार'या जपानी सिनेमाने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमाच्या ऑस्करवर आपलं नाव कोरलंय. आपल्या अभिनयाने सिनेरसिकांना मंत्रमुग्ध करणार्‍या सॅम्युएल जॅक्सन यांना ऑनररी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. आपल्या विनोदी सिनेमे आणि नाटकांनी कित्येक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या लेखिका, दिग्दर्शिका इलेन मे यांनाही ऑनररी ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.

प्रथमेश हळंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT