सोलापूर : अमोल व्यवहारे : राज्यात वाहन प्रदूषण नियंत्रण चाचणीचे (पीयूसी) दर वाढले आहेत. आता दुचाकीसाठी 35 रुपयांऐवजी 50 रुपये मोजावे लागतील. पेट्रोलवरील कारसाठी 125 रुपये, तर डिझेलवरील वाहनांसाठी 150 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत.
राज्यात वाहन प्रदूषण नियंत्रण चाचणीचे (पीयूसी) दर गुरुवार, 28 एप्रिलपासून वाढलेे आहेत. आता दुचाकीसाठी 35 रुपयांऐवजी 50 रुपये मोजावे लागतील. पेट्रोलवरील कारसाठी 125 रुपये आणि डिझेलवरील वाहनांसाठी 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहेत. परिवहन आयुक्तालयाने त्यासंबंधीचा आदेश बुधवारी काढला आहे.
राज्यात गेल्या 10 ते 12 वर्षांत पीयूसीचे दर वाढविले नव्हते. अद्याप 2011 मध्ये निश्चित केलेले दर लागू होते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात पीयूसी केंद्रचालक अडचणीत सापडले होते. त्यातच 'परिवहन'च्या ऑनलाईन कार्यप्रणालीमुळे पीयूसी केंद्राच्या कामकाजात आमुलाग्र बदल झाला. ऑनलाईन कामकाजासाठी पीयूसीचालकांचा खर्च वाढला. त्यामुळे त्यांचा नफ्याचा टक्का घटला होता. परिणामी पीयूसी केंद्र चालविणेही कठीण झाले होते, असा दावा करून ऑल पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशनने गेल्यावर्षी दरवाढीचा प्रस्ताव परिवहन आयुक्तालयाला पाठवला होता. त्यावर परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी परिस्थितीचा अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार परिवहन आयुक्तांनी पीयूसी दरवाढीचा निर्णय जाहीर केला आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील केंद्रचालकांची बैठक घेऊन त्यांना सुधारित दरांबाबतची माहिती दिली जाणार आहे. प्रत्येक पीयूसी केंद्रावर सुधारित दरांचे फलक दर्शनी भागात लावणे केंद्रचालकांना अनिवार्य आहे. 'आरटीओ'ची वायूवेग पथके 'पीयूसी' केंद्रावर वेळोवेळी तपासणी करतील, असे परिवहन आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे.