मुंबई : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणार्या राज्यसेवा परीक्षेची पद्धत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. या बदलाची कार्यवाही राज्यसेवा परीक्षा 2023 पासून केली जाणार आहे. वर्णनात्मक स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका, मुलाखत आणि लेखी परीक्षा मिळून 2 हजार 25 गुण असे सुधारित योजनेचे स्वरूप आहे. दरम्यान, 'दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब'साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.
राज्य सेवा पूर्वपरीक्षेतील पेपर क्रमांक दोन अर्थात सी सॅट हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने एमपीएससीने माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त केली होती.
या समितीच्या शिफारशीनुसार सी सॅट विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय एमपीएससीने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. या समितीच्या कार्यकक्षेमध्ये राज्यसेवेची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम सुधारित करण्याचाही समावेश होता. या संदर्भातील समितीच्या शिफारशीही एमपीएससीने स्वीकारल्या.
या परीक्षेच्या माध्यमातून सहायक कक्ष अधिकारी या पदाच्या 42 जागा राज्य कर निरीक्षक पदाच्या 77, तर पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 603 जागा भरल्या जाणार आहेत.
सुधारित परीक्षा योजनेमध्ये नऊ पेपर्सचा समावेश असेल. त्यातील भाषा पेपर एक मराठी, भाषा पेपर दोन इंग्रजी हे प्रत्येकी तीनशे गुणांचे विषय असतील. मराठी किंवा इंग्रजी माध्यम निबंध, सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक एक, वैकल्पिक विषय पेपर क्रमांक दोन हे एकूण सात विषय प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी 275 गुण असतील. त्यामुळे एकूण गुण 2 हजार 25 असतील. सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल.
आठशे जागांसाठी जाहिरात
'दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब'साठी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 8 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. 800 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्याने स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये आनंद आहे. विशेष म्हणजे आयोगाच्या माध्यमातून 1994 नंतर पहिल्यांदाच दुय्यम निबंधक या पदाची भरती केली जाणार आहे. सबरजिस्ट्रार या संवर्गाची 78 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी 15 जुलै ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.