मुंबई : पुढारी वृत्तसेवा
औरंगजेबाच्या थडग्यावर डोके टेकवणार्यांसोबत शिवसेना कदापि जाणार नाही, अशी जळजळीत टीका करत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'एमआयएम'बरोबर युतीची शक्यता रविवारी फेटाळून लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोणत्या पक्षासोबत आघाडी करण्याचा अधिकार राज्याच्या युनिटला नाही, असे सांगत 'एमआयएम'चे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेला आघाडीचा प्रस्ताव धुडकावला. 'एमआयएम'ही भाजपप्रमाणे कट्टरतावाद पसरविणारा पक्ष असल्याने काँग्रेसचा त्यांना विरोध आहे, अशी भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडल्याने 'एमआयएम'शी महाविकास आघाडीची युती होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
एमआयएमचे औरंगाबादमधील खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीत सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले होते. तसेच आघाडीसोबत घटक पक्ष जोडले जात असतील तर आनंदच आहे, असे वक्तव्य शनिवारी केले होते. त्यानंतर भाजपने शिवसेनेला 'जनाब सेना' म्हणून ज्या पद्धतीने लक्ष्य करण्यास सुरुवात केली, खासकरून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेबाबत तत्काळ प्रतिक्रिया देताना शिवसेनेचा जनाब सेना असा उल्लेख करताच शिवसेनेला हिंदुविरोधी व मुस्लिम धार्जिणे ठरविण्याचा कुटिल डाव असल्याचे शिवसेनेला जाणवले.
त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी तत्काळ प्रसारमाध्यमांसमोर येत एमआयएमसोबत युती करणार नसल्याचे सांगत भाजपचे यामागे षड्यंत्र असल्याचा दावा केला. एमआयएमबाबत शिवसेनेची आलेली तत्काळ व तिखट प्रतिक्रिया समोर येताच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली. यानंतर दुसर्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी भाजपचेच हे षड्यंत्र असल्याचे जाहीर भाष्य करताच एमआयएमला महाविकास आघाडीत स्थान नाही हे काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीर केले.
शिवसेनेचे राज्यभरात चार दिवसांचे शिवसंपर्क अभियान मंगळवार (ता. 22) पासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांत हे अभियान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार, जिल्हाप्रमुख यांना शिवसेना भवनामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धव ठाकरे यांनी रविवारी संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीसोबत एमआयएमचा आघाडीचा प्रस्ताव हे भाजपचेच षड्यंत्र आहे. शिवसेनेला हिंदूविरोधी व मुस्लिमधार्जिणे ठरविण्यासाठी भाजपने हा डाव आखला आहे. एमआयएम ही भाजपचीच बी टीम आहे. त्यामुळे भाजपचा हा डाव शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून उधळून लावा, भाजपचे हिंदुत्व कसे थोतांड आहे ते जनतेला घरोघरी जाऊन सांगा. शिवसैनिक हिंदुत्वाचा अंगार असतो हे त्या भंगारांना दाखवून द्या, अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले.
गेल्या काही काळापासून एका जागी बसून राहावे लागले. आधी कोरोना आणि नंतर मानेचे दुखणे आले. परंतु येत्या काही दिवसांत मी संपूर्ण राज्याच्या कानाकोपर्यात फिरणार आहे. परंपरागत भाजपकडे असलेल्या मतदारसंघात आपल्याला संघटनात्मक ताकद वाढवावी लागणार आहे. पूर्वी आपण छोट्या मोठ्या निवडणुका गांभीर्याने घेत नव्हतो. पण भाजपला पंचायत ते पार्लमेंट अशा सर्व ठिकाणी सत्ता हवी आहे. ही भाजप नीती देशासाठी घातक आहे. त्यामुळे आता यापुढे आपल्यालाही सर्व निवडणुका गांभीर्याने लढवाव्या लागतील, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्या भाजपवर टीकास्त्र सोडताना उद्धव ठाकरे म्हणाले की, अयोध्येला गेलो तेव्हाच मी सांगितले, आम्ही भाजपला सोडले आहे. हिंदुत्वाला नाही. शिवसेना हिंदुत्वासाठी राजकारण करते. पण भाजप राजकारणासाठी हिंदुत्व – हिंदुत्व करत आहे. भाजपचा डाव व त्याच्या कुरापती ओळखा. आपल्याला हिंदुत्वविरोधी व मुस्लिमधार्जिणे ठरविण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. काहीच कारण नसताना अचानक एमआयएम महाविकास आघाडीत येण्याचा प्रस्ताव का देते? आमचा आणि एमआयएमचा काय संबंध? आम्ही मेलो तरी त्यांच्यासोबत जाणार नाही. प्रत्येक वेळी भ्रम निर्माण करून 'हिंदू खतरे में' अशी अनामिक भीती दाखवून सत्ता मिळवायची, असे सांगत भाजपने उत्तर प्रदेशात विजय मिळवला, अशी टीका ठाकरेंनी केली.
शिवसंपर्क अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यांत चार दिवस होत आहे. या 19 जिल्ह्यांत शिवसेनेचे 19 खासदार शिवसंपर्क अभियान सुरू करणार आहेत. पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यांत – प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार, तेथील जिल्हाप्रमुख आणि त्यांच्या सोबत शिवसेना पदाधिकार्यांची 12 जणांची टीम कार्यरत असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शिवसेना करत असलेल्या विकासकामांची माहिती पोहोचवणार आहे.
महाविकास आघाडीत सामील होण्याबाबतचा एमआयएमचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धुडकावून लावला आहे. पवार म्हणाले की, एखादा पक्ष कोणासोबत जायचे हे ठरवू शकतो. पण ज्यांच्यासोबत जायचे आहे, त्यांनी होय म्हटले पाहिजे. एमआयएमचा प्रस्ताव अथवा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता प्रस्तावित केला तरी राष्ट्रीय कार्यकारिणी जोपर्यंत निर्णय घेत नाही, तोपर्यंत राज्य कार्यकारिणी याबाबत निर्णय घेऊ शकत नाही. त्यांना तसे अधिकार नाहीत. हा आमच्या द़ृष्टीने हा विषय संपला असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले.
एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेस पक्षाने विरोध केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एमआयएमला भाजपप्रमाणे कट्टरतावाद पसरविणारा पक्ष असल्याने काँग्रेसचा त्यांना विरोध असल्याचे आहे. काँग्रेस लोकशाहीचे मूलभूत तत्त्व मानणारा पक्ष आहे. कट्टरतावाद कोणताही असो, तो काँग्रेसला मान्य नाही. समविचारांमध्ये घटनेचे तत्त्व मानले गेले पाहिजेत. एका समाजासाठी नाही, त्यात एमआयएम बसत नाही. भाजपचा जसा कट्टरतावाद आहे तसाच कट्टरतावाद एमआयएमचा आहे. त्यामुळे एमआयएमला महाविकास आघाडीत घेण्यास काँग्रेसचा विरोध राहील. एमआयएमबाबत शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडलेली भूमिका योग्य असल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख तीन पक्षांनी एमआयएमला आघाडीत स्थान नाही, अशी जाहीर भूमिका घेतल्यानंतरही एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे माझ्यासह राज्यातील संपूर्ण जनतेचे मुख्यमंत्री आहेत. मी त्यांना जाऊन भेटणार, अशी प्रतिक्रिया जलील यांनी दिली. शरद पवार यांना भेटून परिस्थिती सांगू आणि वेळ पडल्यास उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊ, असे जलील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, जलील आपल्या मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी भेटू शकतात, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.