मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : एनसीबीच्या मुंबई विभागीय संचालकपदी अमित गवाटे या मराठी अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. खंडणी वसुलीचे गंभीर आरोप झालेले एनसीबी मुंबई विभागाचे तत्कालीन प्रमुख समीर वानखेडे यांच्या गच्छंतीनंतर ही जबाबदारी कुणाकडे सोपविली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूरचे रहिवासी गवाटेे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. त्यांना यापूर्वीही एनसीबीमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. एनसीबीमध्ये तीन अधिकार्यांच्या नियुक्तीचे हे पत्र आहे. यात बंगळूर विभाग संचालक आणि चेन्नईचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असलेल्या अमित गवाटेे यांची मुंबई विभागाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गवाटे यांच्यासह अमनजितसिंह यांची चंदीगड एनसीबी विभागीय संचालक आणि ग्यानेंद्रकुमार सिंह यांची अन्य काही अतिरिक्त कार्यभारासह दिल्ली येथे विभागीय संचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीवर कारवाई करत बॉलिवूडचा किंग खान शाहरुन खान याचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर आरोपांच्या फेर्यांत अडकलेल्या एनसीबीच्या मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांना मुदतवाढ न देता गेल्या 31 डिसेंबरला पदावरुन हटविण्यात आले होते. यावेळी एनसीबीवरसुद्धा मोठे आणि गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यामुळे एनसीबीची स्वच्छ प्रतिमा निर्माण करुन कारवाई करण्याचे एक मोठे आव्हान गवाटेे यांच्यासमोर असणार आहे.