Latest

एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन : मुंग्यांचा माणूस…

अमृता चौगुले

अवघ्या सृष्टीचा विचार करणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन खर्‍या अर्थानं 'निसर्गपुत्र' होते. मुंग्या हा अभ्यासाचा विषय असल्याने त्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. त्यांनी मुंग्यांच्या विविध अशा 400 प्रजाती शोधून काढल्या. उत्क्रांतीचं तत्त्व मांडणारे चार्ल्स डार्विन यांचा वारस असेही विल्सन यांना मानले जाते.

'आपल्या भावभावना या अश्मयुगीन काळातल्या असाव्यात अशा आहेत. प्रथा-परंपरा-रीती-प्रघात हे मध्ययुगीन काळाला शोभेसे आहेत. पण आपल्याकडं असणारं तंत्रज्ञान मात्र दैवी शक्‍ती असलेलं वाटावं असं आहे…' असं म्हणणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन हे खरं तर धर्मगुरू व्हायचे. लहान वयात ते धर्माचं शिक्षण घेत होते. त्याचवेळी त्यांनी उत्क्रांतीचा अभ्यास केला आणि त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. वसुंधरेवरच्या विविध जीवजातींनी त्यांना भुरळ घातली. अनेकविध जातींचे आणि आकाराचे पक्षी यांच्याबद्दल त्यांना विलक्षण कुतूहल वाटायला लागलं. त्यांनी पक्षीविद्येचा अभ्यास करायचं ठरवलं. पण वयाच्या 13 व्या वर्षीच त्यांना विचित्र अपघात झाला. मासेमारी करत असताना माशाच्या धारदार कल्ल्याचं टोक त्यांच्या उजव्या डोळ्यात घुसलं. त्या अनपेेक्षित अपघातानं त्यांच्या उजव्या डोळ्याची दृष्टी कमी झाली. त्यांना लांबवरचं पाहणं कठीण व्हायला लागलं. पक्षीविद्येचा अभ्यास करण्याचा विचार सोडून द्यावा लागला. मग त्यांनी आपलं लक्ष लहान आकाराच्या, सहजपणं जवळून निरीक्षण करता येतील अशा कीटकांकडं वळवलं. त्यातूनही मुंगीनं त्यांना फारच भुरळ घातली. त्यांना मुंग्यांचं निरीक्षण आणि अभ्यास करण्याच्या विचारानं विलक्षण पछाडलं आणि मग ते त्यांच्या आयुष्यातलं जणू एक ध्येयच बनून गेलं.

सजीवांप्रती आपुुलकी आणि प्रेम असणार्‍या एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन यांचा जन्म दि. 10 जून 1929 रोजी अमेरिकेतल्या अलाबामामधील बर्मिंगहॅम इथं झाला. त्यांचे वडील अकाऊंटंट होते तर आई सेक्रेटरी होती. एडवर्ड आठ वर्षांचे असतानाच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. वडील मद्याच्या आहारी गेले होते. आई सोडून गेल्यानंतर लहानगा एडवर्ड झाडझाडोरा, पक्षी, कीटक, ओढे आणि नद्या यांचं निरीक्षण करण्यात रमू लागला. निसर्गाची स्पंदनं टिपू लागला. आपल्या भोवतालच्या सजीवसृष्टीनं जणू त्याच्यावर गारुड केलं. पण उजवा डोळा जवळपास निकामी झालेला असल्यानं एडवर्ड यांनी आपलं लक्ष मुंगीसारख्या लहान कीटकांकडं वळवलं. मात्र त्यावेळेस त्यांचं मुंग्यांचं प्रेम हे लहानपणीचा एक छंद इतकंच होतं. तो छंद जोपासतानाच त्यांनी अमेरिकेत परदेशांतून आलेल्या मुंग्यांची वसाहत शोधून काढली. त्यावेळी त्यांचं वय होतं 13 वर्षांचं. मात्र आपल्या वेडापायी त्यांनी अभ्यासाकडं दुर्लक्ष केलं नाही. युनिव्हर्सिटी ऑफ अलाबामामधून ते जीवशास्त्र हा विषय घेऊन पदवीधर झाले आणि नंतर त्याच विषयामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला. 1950 सालामध्ये ते पीएच.डी. करण्यासाठी हार्वर्ड युनिव्हर्सिटीत गेले. तिथून पीएच.डी. झाल्यानंतर 1953 मध्ये मुंग्यांचा तपास करण्याच्या मोहिमेला त्यांनी क्युबापासून सुरुवात केली. तिथून ते मेक्सिको, मग न्यूगियाना इथं गेले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा दक्षिण प्रशांत महासागरातील दुर्गम बेटांकडं वळवला. भौगोलिक प्रदेशानुसार मुंग्यांच्या जातींमध्ये येणारी विविधता त्यांनी पाहिली. या मुंग्या एका ठिकाणाहून दुसर्‍या जागी कशा गेल्या असाव्यात, त्यांच्यामध्ये उत्क्रांती कशी होत गेली असेल, त्यासाठी किती काळ जावा लागला असेल, याचा त्यांनी शोध घेतला. तिथून परतल्यावर त्यांनी इरने केली या तरुणीशी लग्‍न केलं. त्यांना कॅथरिन नावाची एक मुलगीही झाली. 1956 सालामध्ये विल्सन हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागले. जैविक विविधतेबद्दल अंदाज कसा बांधता येईल, याबाबत त्यांनी संशोधन सुरू केलं. त्यांच्याबरोबर रॉबर्ट मॅक्आर्थर हा युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानियामधील जीवशास्त्राचा प्राध्यापकही काम करू लागला. या दोघांनी मिळून काम करून एखाद्या बेटावर किती प्रकारच्या जीवजाती असू शकतील, याचा अंदाज बांधणारं समीकरण विकसित केलं.

या समीकरणाची चाचणी त्यांनी अगदी लहान बेटांवर घेतली. या बेटांवर तिवराची झुडपं होती. ही बेटं त्यांनी तंबू ठोकून झाकून टाकली. जमिनीवरच्या गोगलगायी हाताने गोळा करून बेटाबाहेर नेल्या. बेटावर त्यांनी अगदी कमी काळ प्रभावी असणारी कीटकनाशकं टाकली. असं करून त्यांनी त्या बेटांवरचा जैविक समतोल बिघडवून टाकला होता. पण त्या इटुकल्या बेटांनी आपला जैविक समतोल अगदी पूर्णपणं सावरलं आहे, असे लवकरच त्यांच्या ध्यानात आले. तिथे पूर्वी होत्या त्यापेक्षा नवीन जीव जाती आता आल्या आहेत, हेही त्यांच्या ध्यानात आलं. या कामावर आधारित त्यांनी 'द थिअरी ऑफ आयलंड बायोजिओग्राफी' हे पुस्तक लिहिलं. ते 1967 मध्ये प्रसिद्ध झालं. 'परिसंस्था' या विषयावरचं ते एक महत्त्वाचं पुस्तक ठरलं. या पुस्तकात त्यांनी 'बेटांचा जैवभूगोल सिद्धांत' (द थिअरी ऑफ आयलंड बायोजिओग्राफी) मांडला. या विषयामध्ये काम करणार्‍यांना तो कायमच मार्गदर्शक ठरत आला. विल्सन यांच्या कामाचं आणि त्याच्या प्रभावाचंं हे एक उदाहरण. पण अशी अनेक कामं विल्सन यांनी आपल्या सहकार्‍यांसह केली. संशोधन, चिंतन आणि निरीक्षण हाच आयुष्यभराचा ध्यास असणार्‍या विल्सन यांनी वीसहून अधिक पुस्तकं लिहिली. त्यांच्या 'ऑन ह्युमन नेचर' (प्रकाशन 1978) आणि 'द अँटस' (1990) पुस्तकांना पुलित्झर पुरस्कार मिळाले. 'नॅचरलिस्ट' हे त्यांचं आत्मचरित्र 1990 मध्ये प्रकाशित झालं. 2010मध्ये त्यांची 'अँटहिल' नावाची कादंबरी प्रसिद्ध झाली.

आपली पृथ्वी चैतन्यानं मुसमुसलेली आहे, नवनिर्मितीक्षम आहे. तिच्यावर विस्मयचकित करणारी बहुरंगी बहुविधता आहे, इथलं सतत स्पंदनशील असणारं जीवन हे मोठं लोभस आहे. या सार्‍याच्या मागे नेमकं काय आहे? आपल्याला आजवर जे काही माहीत झालं आहे, जे ज्ञान मिळालं आहे, त्याच्याही पलीकडं प्रचंड बुद्धिमान अशी एखादी शक्‍ती या सार्‍या पसार्‍यामागं असण्याची शक्यता आहे, असं विल्सन आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात म्हणत असत. या निष्कर्षापर्यंत येण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रचंड काम केलं. मुंग्या हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असल्यानं त्यांच्या विविध जाती शोधण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. वेगवेगळ्या देशांमध्ये तर ते गेलेच; पण अनेक बेटांनासुद्धा त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह भेटी दिल्या. तिथं मुक्‍काम केले. या सार्‍याची परिणती म्हणजे त्यांनी मुंग्यांच्या विविध अशा 400 प्रजाती शोधून काढल्या. परस्परांशी संवाद साधण्यासाठी मुंग्या 'फेरोमोन' या रसायनाचं उत्सर्जन करतात, त्यांचं एकंदर जीवन खूपच गुंतागुंतीचं असतं. कोणताही निर्णय त्या सामूहिक रीतीनं घेतात हेसुद्धा विल्सन यांनीच शोधून काढलं. पण मुंग्याच नाही, तर एकंदरच निसर्गाबद्दल त्यांना अगम्य कुतूहल होतं. मानवी समाजातल्या सर्वच घटकांचं वर्तन आणि त्यांच्या सवयी यामागं जनुकीय ठेवण (जेनेटिक सेटअप) हेच कारण असतं, असं विल्सन यांनी आपल्या 1975 मध्ये प्रसिद्ध झालेल्या (सोशिओबायोलॉजी ः द न्यू सिन्थेसिस) पुस्तकात नमूद केलं. विल्सन यांच्या या विचारावरून बरंच वादळ उठलं. त्यांच्यावर टीकाही झाली. पण ते अविचल राहिले. त्यांचा सृष्टी विज्ञानाचा अभ्यास, कीटकशास्त्रामध्ये त्यांनी केलेलं अजोड काम यामुळं त्यांना 'मुंग्यांचा माणूस' असं म्हटलं जातं. उत्क्रांतीचं तत्त्व मांडणारे चार्ल्स डार्विन यांचा वारस असंही विल्सन यांना मानलं जातं. कोणत्याही विशिष्ट भूभागाचा, प्राणिजगाचा किंवा मानवी समूहाचा विचार न करता अवघ्या सृष्टीचा विचार करणारे एडवर्ड ऑसबॉर्न विल्सन खर्‍या अर्थानं 'निसर्गपुत्र' होते. गेल्या 26 डिसेंबरला त्यांचे निधन झाले. त्यांच्या कामगिरीला सलाम!

-श्रीराम शिधये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT