नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील एका तरुणाने जुळ्या बहिणींसोबत एकाच मांडवात लग्न केले होते. लोकसभेत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी गुरुवारी हा विषय उपस्थित केला. असे विवाह रोखण्यासाठी कलम 494, 495 ची तरतूद असताना ही घटना घडलीच कशी, असा राणा यांचा प्रश्न होता.
अतुल अवताडे (नवरदेव) याच्या विरोधात कारवाईची मागणीही राणा यांनी केली. अतुलने रिंकी आणि पिंकी पाडगावकर या जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात 2 डिसेंबर रोजी लग्न केले होते. एकाने अतुलविरुद्ध पोलिसांत तक्रारही नोंदविली होती; पण पोलिसांकडून झालेली चौकशीची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली होती. तक्रार करणारी व्यक्ती नवरदेव किवा नवरी कुणाच्याही कुटुंबातील सदस्य नाही. तो या तिघांच्या रक्ताच्या नात्यातही नाही. त्यामुळे तक्रार घेता येत नाही, असे न्यायालयाने त्यावर स्पष्ट केले होते. हा मुद्दाही राणा यांनी संसदेत उपस्थित केला.