मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बुधवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादीचे नेते हे ठाकरे यांच्या सदिच्छा भेटीसाठी मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात होते. सहकारी पक्षांशी कोणतीही चर्चा न करता शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केल्याने काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे मविआच्या भवितव्याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. तसेच, बिहारमधील सत्तांतरानंतर महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षांनी एकत्र राहायला हवे, अशीही भूमिका मांडली गेली. या सर्व पार्श्वभूमीवर रात्री अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, जयंत पाटील आणि सुनिल तटकरे हे नेते मातोश्री वर दाखल झाले.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्या नंतर नवे सरकार स्थापन झाले. या दरम्यानच्या काळात आमच्या भेटी झाल्या नाहीत. भेटून चर्चा करण्यासाठी ही सदिच्छा भेट घेणार असल्याचे अजित पवार यांनी भेटीपुर्वी स्पष्ट केले होते.