मुंबई : पुढारी वृत्तसेवा शिवसेना नेत खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याकडे कसून चौकशी केली. तब्बल सात तासांहून अधिक काळ ही चौकशी झाली. ईडीने वर्षा राऊत यांना समन्स बजावून शनिवारी ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास त्या ईडीसमोर हजर झाल्या. सायंकाळी उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. त्यांच्यासोबत ईडी कार्यालयापर्यंत गेलेली त्यांची मुलगी आणि संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत हे त्यांची ईडी कार्यालयाबाहेर वाट बघत थांबले होते.
गोरेगावमधील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या सुमारे 1 हजार 40 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी मनी लाँडरिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. याच प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री या बंगल्यावर छापेमारी करून राऊतांना अटक केली. होती. ते सध्या ईडी कोठडीत आहेत. ईडीच्या अधिकार्यांच्या दोन वेगवेगळ्या पथकांनी वर्षा राऊत यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यानंतर वर्षा राऊत आणि संजय राऊत यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळेच येत्या काळात संजय राऊत यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात झालेल्या घोटाळ्यातील 112 कोटी रुपये प्रवीण राऊत यांना मिळाले होते. प्रवीण राऊत यांच्या कंपनीतून 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात वळविण्यात आले असल्याचे उघडकीस आले आहे. घोटाळ्यातील याच पैशांतून दादर येथील फ्लॅटसह अलिबागमध्ये 10 जमिनी खरेदी करण्यात आल्याचा आरोप ईडीने राऊतांवर ठेवला आहे. राऊत दाम्पत्याच्या बँक खात्यात काही मोठ्या रकमांचेही व्यवहार झाल्याची माहिती ईडीला मिळाली आहे. त्यानुसार ईडीच्या अधिकार्यांनी वर्षा राऊत यांच्याकडे कसून चौकशी केली.