इस्लामपूर ; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या दक्षिण बाजूकडील शाहूनगर परिसरात सोमवारी पहाटे बिबट्याचे दर्शन झाले. तेथे काम सुरू असलेल्या इमारतीच्या भिंतीवर बिबट्या बसला होता. कुत्र्यांच्या भुंकण्याने लोक जागे झाले. त्यांची चाहूल लागताच तेथून बिबट्याने पलायन केले.
सोमवारी पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास जिजाऊनगर परिसरात कुत्र्यांच्या भुंकण्याने नागरिक जागे झाले. तेथील अभिनंदन पाटील यांनी त्यांच्या घराच्या गच्चीवरून कुत्री का भुंकतात म्हणून इमारतीवरील दिवा लावला. त्यावेळी त्यांच्या घराशेजारील सुरू असलेल्या बांधकामाच्या भिंतीवर बिबट्या बसलेला दिसला. लोकांची चाहूल लागताच त्याने तेथील शेतातून पळ काढला.
सोमवारी वनरक्षक अमोल साठे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तेथे असलेले बिबट्याचे ठसे, तसेच घटनास्थळी पडलेले बिबट्याच्या केसांची पाहणी केली. परिसरातील नागरिकांनी रात्रीच्यावेळी एकटे बाहेर पडू नये. वस्तीवरील दिवे चालू ठेवावेत. बिबट्याचा वावर असल्याने सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून वाळवा तालुक्यात बिबट्यांनी धुमाकुळ घातला आहे. पेठ, नेर्ले, रेठरेधरण, कामेरी, काळमवाडी, शेणे, वाटेगाव, येडेनिपाणी, तांबवे, कापूसखेड आदी परिसरात बिबट्याने जनावरांवर हल्ले केल्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे या गावांच्या शिवारात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. आता बिबट्याने इस्लामपूर शहराच्या उपनगरातच एन्ट्री केल्याने नागरिकांच्यात भितीचे वातावरण आहे.
कामेरीच्या दिशेेने पलायन…
जिजाऊनगर परिसरातील 10ते 15 कुत्र्यांचा कळप बिबट्याच्या मागे लागल्याने तो तेथे बांधकाम सुरू असणार्या इमारतीच्या भिंतीवर जाऊन बसला होता. कुत्र्यांच्या सततच्या भुंकण्याने परिसरातील नागरिक जागे झाले. अभिनंदन पाटील यांनी तेथील दिवा लावताच बिबट्याने भिंतीवरून उडी मारून कामेरीच्या दिशेने पळ काढला. त्याने खाली उडी मारताच कुत्र्यांनीही त्याचा पाठलाग केला.