Latest

इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर करसवलतीचा लाभ

Arun Patil

भारतीय वाहन उद्योग सध्या इलेक्ट्रिक व्हेईकलच्या क्रांतीकडे वाटचाल करत आहे. मग इंधन दरवाढ असो किंवा प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी आखण्यात येणार्‍या उपाय योजनांचा भाग असो. सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेईकलचा बोलबाला होत आहे. भारतीय नागरिकांचादेखील इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदी करण्याकडे कल दिसून येत आहे. अनेक राज्य सरकारांनीदेखील इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर भरीव सवलत दिली आहे. इलेक्ट्रिक वाहनांवर जवळपास सर्वच राज्यात नोंदणी आणि विमा मोफत आहे.

एका अर्थाने इलेक्ट्रिक गाड्या चालवून आपण केवळ पेट्रोलचा खर्च वाचवत नाही, तर प्राप्तिकरातदेखील सवलत मिळवू शकता. अर्थात, भारतीय कर कायद्यानुसार व्यक्तिगत वापरासाठी उपयोगात आणली जाणार्‍या मोटारीला आलिशान उत्पादन श्रेणीत ठेवले आहे. त्यामुळे नोकरदार वर्गांना वाहन कर्जावर कोणतीही सवलत मिळत नाही. परंतु इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदी करत असाल तर सरकार आपल्याला नक्कीच करसवलत प्रदान करेल.

फायदा कसा?

भारतात इलेक्ट्रिक व्हेईकलला प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने नवीन कलम अमलात आणले आहे. हे कलम इलेक्ट्रिक व्हेईकलच्या मालकांना करात सवलत प्रदान करते. प्राप्तिकर कायद्यानुसार इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी कर्जाची परतफेड करताना कलम 80 ईईबीनुसार कर सवलत प्रदान करण्यात आली आहे. याप्रमाणे आपण इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यानंतर एकूण दीड लाखांपर्यंतची करबचत करू शकता.

मोटार असो किंवा स्कूटर सर्वांवर लाभ

प्राप्तिकर कायद्याचा लाभ मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत कोणताच फरक केलेला नाही. आपण चारचाकी घ्या किंवा दुचाकी घ्या किंवा इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी करा, आपल्याला दरवर्षी दीड लाखापर्यंत करसवलत मिळेल. जी मंडळी कर्जावर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्याचा पर्याय निवडत असतील, ते खरेदीदार कलम 80 ईईबीनुसार कर्जफेडीपोटी भरलेल्या व्याजावर दीड लाखांपर्यंत करसवलत मिळवण्यास पात्र असेल.

लाभ कोणाला

केवळ व्यक्तिगत करदाताच या सवलतीचा लाभ मिळवू शकतो. अन्य कोणताही करदाता या कपातीला पात्र नाही. म्हणजेच एचयूएफ, एओपी (असोसिएशन ऑफ पर्सन्स), पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी अन्य श्रेणीतील करदाते या सवलतीचा लाभ मिळवू शकत नाहीत.

केवळ एकदाच सवलत

ही सवलत प्रत्येक व्यक्तीला केवळ एकदाच उपलब्ध आहे. जर आपण करदाते असाल अणि आपल्याकडे अगोदरच इलेक्ट्रिक गाडी किंवा मोटार असेल आणि इलेक्ट्रिक गाडी नव्याने खरेदी केली तरी करसवलतीचा लाभ घेता येणार नाही. केवळ नवीन ग्राहकांना सेक्शन 80 ईईबी कर कपातीचा लाभ मिळू शकेल.

रोखीवर करसवलत नाही

लक्षात ठेवा, आपल्याला करसवलतीचा लाभ हा कर्जापोटी भरलेल्या व्याजावर मिळणार आहे. अशा वेळी आपण कर्जरूपाने गाडी घेत असाल तरच करसवलतीचा लाभ मिळेल. इलेक्ट्रिक व्हेईकलचे कर्ज सरकारी, खासगी किंवा एनबीएफसी बँकेने मंजूर केलेले असावे. रोखीने गाडी खरेदी केल्यास करसवलतीचा लाभ मिळणार नाही.

विधिषा देशपांडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT