तेहरान ; वृत्तसंस्था : इराणच्या सैन्याने त्यांची लष्करी ताकद दाखविण्यासाठी क्षेपणास्त्रांनी तयार असलेल्या ड्रोन्सची छायाचित्रे जारी केली आहेत. इराणच्या सरकारी टीव्ही वाहिनीवरून ही छायाचित्रे दाखविण्यात आली आहेत. या वाहिनीने इराणकडे जगात सर्वाधिक ड्रोन्स असल्याचा दावाही केला आहे. हे सर्व ड्रोन्स इराण मधील एका भूमिगत तळात असून हा तळ कुठे आहे, याची माहिती उघड करण्यात आलेली नाही.
या तळावर इराणने कमीत कमी 100 ड्रोन्स ठेवले आहेत. यात कमान-22 हे ड्रोन्स असून त्यावर धोकादायक क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. तसेच कईम-5 ड्रोन्सही आहेत.
नुकतेच इराणचे लष्करप्रमुख मेजर जनरल अब्दुलरहीम मौसवी आणि इराणच्या लष्कराचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल मोहम्मद बघेरी यांनी नुकताच या गुप्त तळाचा दौरा केला आहे. मौसवी म्हणाले की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सैन्य सर्वाधिक मजबूत सैन्य आहे. कोणत्याही स्थितीत तत्काळ प्रत्युत्तर देण्यासाठी हे ड्रोन्स तयार असल्याचे जेरूसलेम पोस्टने म्हटले आहे.
ठिकाण कुणालाच माहिती नाही
इराणच्या या तळाचे नेमके लोकेशन कुणालाही माहिती नाही. केमनशाह शहरापासून 40 मिनिटांच्या अंतरावर हा तळ असल्याची शक्यता आहे. तर काहींच्या मते जागरोस पर्वत रांगांच्या खाली बनवलेल्या बोगद्यात इराणी सैन्याने हे ड्रोन्स ठेवल्याचे म्हटले जात आहे.
1980 पासून ड्रोन्सची निर्मिती
इराणच्या वृत्त वाहिनीच्या मते, ही ड्रोन्स कुठल्याही शत्रूंना क्षणात मारण्याची क्षमता बाळगून आहेत. इराणने 1980 मध्ये ड्रोन विकसित करण्यास सुरुवात केली होती. या काळात इराण-इराक युद्ध सुरू झाले होते.