Latest

इम्रान खान यांचा पराभव अटळ! ३ एप्रिलला अविश्वास ठरावावर मतदान

अमृता चौगुले

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या राजकारणात हा आठवडा कळीचा ठरतो आहे. गृहमंत्री शेख रशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर 3 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तत्पूर्वी, मंगळवारी इम्रान यांच्या तहरिक-ए-इन्साफ पक्षाला चौधरी आसिम नाजीर आणि मोहम्मद असलम भुटानी यांनी 'खुदा हाफिज' ठोकला आहे. पाकिस्तानला क्रिकेटमधील विश्वचषक पहिल्यांदाच जिंकून देणार्‍या इम्रान यांच्या राजकीय संघातील आणखी दोन गडी बाद झाले आहेत. इम्रान यांच्या पक्षातून गळती सुरूच असल्याने प्रस्तावावरील मतदानात त्यांचा पराभव अटळ आहे.

यादरम्यान 'पाकिस्तान डेमोक्रेटिक फ्रन्ट' (पीडीएफ) नावाने खान यांच्याविरोधात निर्माण करण्यात आलेल्या आघाडीने पंतप्रधान पदासाठीचा आपला उमेदवार म्हणून शहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा केली आहे. इम्रान यांनी त्यांचा सहयोगी पक्ष असलेल्या 'पीएमएल क्यू'ला पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्रिपदाचे आमिष देऊन विरोधी तंबूत जाण्यापासून रोखण्यासाठीचा अखेरचा डावही खेळून झाला आहे. पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांना त्यासाठी खान यांनी पद सोडायला भागही पाडले आहे. परवेझ इलाही यांची निवड या पदावर केली आहे.

आठ खासदार वाचविले, पण

  • 'पीएमएल क्यू'कडे 8 खासदार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्रिपद या पक्षाला देऊनही इम्रान केवळ या बळावर आपली खुर्ची वाचवू शकणार नाहीत.
  • कारण विरोधी बाकावरील खासदारांचा आकडा 210 वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे आणि बहुमत सिद्ध करायला 172 खासदारांची गरज आहे.

इम्रान खान यांना पराभवाच्या खाईत लोटायचे तर त्यांना अखेरचा धक्का देण्याची हीच योग्य वेळ आहे. या माणसाने देशाचे वाटोळे केले. सरकार वाचविण्यासाठी खान आणि त्यांचे कुटुंब काय काय करते आहे, ते मला तरी पाहवत नाही.
– मरियम नवाज, उपाध्यक्षा,
पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज)

खानविरोधात शहबाज यांची निवड का?

  • 'पीडीएफ'मध्ये नवाज शरीफ यांचा 'पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज', आसिफ अली झरदारी यांचा 'पाकिस्तान पीपल्स पार्टी' आणि मौलाना फजल-उर-रहमान यांचा 'जमियते उलेमा-ए-इस्लाम' हे पक्ष आहेत.
  • मौलाना आणि शहबाज शरीफ दोन्हीही लष्कराच्या जवळचे आहेत. प्रशासनाचा दीर्घ अनुभव असणे, ही शहबाज यांची जमेची बाजू आहे. त्यांनी पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिलेले आहे. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे ते भाऊ आहेत.

आकडे बोलतात (पाक संसदेतील सद्यस्थिती)

  • 342 पाकिस्तान संसदेतील एकूण खासदार
  • 179 खान यांच्याकडील सुरुवातीचे संख्याबळ
  • 172 बहुमताचा जादुई आकडा
  • 08 खान यांच्या बाजूचे अन्य लहानसहान पक्षांतील खासदार
  • 210 एवढे खासदार विरोधी आघाडीच्या तंबूत जमल्याचे सांगण्यात येते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT