इस्लामाबाद ; वृत्तसंस्था : तालिबानी दहशतवादी हे सामान्य नागरिक असून, अमेरिकेने अफगाणिस्तानात घुसून सर्व गडबड केली, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
पाकिस्तानातील 10 हजार दहशतवादी सीमा ओलांडून तालिबानच्या मदतीला गेले आहेत? असा प्रश्न विचारल्यावर इम्रान खान नाराज झाले. ते म्हणाले की, ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. ते आम्हाला या गोष्टीचे पुरावे का देत नाहीत? अफगाणिस्तानमधील शांततेचा उपाय युद्धात नसून, राजकीय करारातूनच शक्य आहे.
पाकिस्तानात 30 लाख अफगाणी निर्वासित राहतात. यात पश्तुनांची संख्या सर्वाधिक आहे. तिथे युद्धपरिस्थिती राहिल्यास तिथून आणखी निर्वासित पाकिस्तानात येतील.
तालिबानी सैन्य मजबूत आहे. ते सामान्य नागरिक आहेत. तालिबानने 1996 ते 2001 या काळात क्रूर पद्धतीने शासन केले होते हे खरे आहे. त्यानंतर अमेरिकेमुळे तालिबानला सत्ता सोडावी लागली. 2001 पासून अमेरिकेने येथे तळ ठोकला आणि सर्व उद्ध्वस्त झाले.
अमेरिकेने अफगाणिस्तानात घुसून सर्व अस्ताव्यस्त केले. अमेरिकेने खूप आधीच राजकीय उपाय शोधण्याचा पर्याय स्वीकारायला हवा होता.