Amit Shah 
Latest

इतिहासकारांनी मुघलांना जास्त महत्त्व दिले : गृहमंत्री अमित शहा

Arun Patil

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशातल्या इतिहासकारांनी पांड्य, मौर्य आणि गुप्त साम्राज्याच्या तुलनेत मुघलांना जास्त महत्त्व दिल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी 'महाराणा : शेकडो वर्षांचे धर्मयुद्ध' नामक पुस्तकाच्या प्रकाशनावेळी केली. देशाचा इतिहास लिहिण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकतो का, असा सवालही शहा यांनी यावेळी उपस्थित केला.

ते म्हणाले, काही लोकांनी इतिहासाला विकृत केले आहे, हे वास्तव आहे. त्यांना जे काही करायचे आहे ते त्यांनी केले आहे; मात्र आम्हाला आमच्या पद्धतीने इतिहास लिहिण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आता आम्ही स्वतंत्र आहोत आणि इतिहास स्वतः लिहू शकतो.

पुढील पिढ्यांसाठी या लढायासंदर्भात लिहिणे अत्यंत आवश्यक ठरले आहे, कारण त्याचमुळे खरा इतिहास समोर येणार आहे, असे सांगून शहा म्हणाले की, इतिहासात अनेक साम्राज्ये होऊन गेली, पण लिहिणार्‍यांनी जेव्हा साम्राज्यांचा उल्लेख केला तेव्हा मुघलांचीच जास्त चर्चा केली. मौर्य साम्राज्य 500 वर्षे चालले तर गुप्त साम्राज्य 400 वर्षे चालले.

याशिवाय पांड्य साम्राज्य 800 वर्षे चालले होते. आसाममध्ये अहोम साम्राज्य 650 वर्षे चालले होते. या साम्राज्याने बख्तियार खिलजीपासून ते औरंगजेबापर्यंतच्या आक्रमणकर्त्यांना हरवले होते. अशाच प्रकारे चालुक्य आणि पल्लव साम्राज्य प्रत्येकी 600 वर्षे चालले होते. बाजीराव पेशवे यांनी तर अटकपासून ते कटकपर्यंत भगवा झेंडा फडकाविला होता. याचाही डाव्या इतिहासकारांना विसर पडल्याची टीका शहा यांनी केली.

शिवाजी महाराजांचा लढा विसरू शकत नाही

इतिहासकार आणि लेखकांनी देशाचा खरा इतिहास जनतेसमोर संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून आणण्याचे आवाहन शहा यांनी केले. आक्रमणकर्त्यांविरोधात भारतीय राजांनी शेकडो वर्षे ज्या लढाया लढल्या, त्या लढायांना विसरले गेल्याबद्दल नाराजी व्यक्त करून शहा पुढे म्हणाले की, देशाच्या पश्चिम क्षेत्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी लढलेल्या लढाया असोत वा आसाममध्ये अहोम राजांनी लढलेल्या लढाया असोत, त्याला कोणी विसरू शकत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT