इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहर व परिसरात पावसाने रविवारी दिवसभर विश्रांती घेतली असली तरी पंचगंगेने मात्र अद्याप आपली माघार घेतलेली नाही. 2005 साली पंचगंगा नदीची पातळी 76 फूट तर 2019 मध्ये 80 फूट होती. गेल्या तीन दिवसांत सातत्याने होणार्या पाणी पातळीतील वाढीमुळे पंचगंगेची पातळी रविवारी तब्बल 79 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे अद्यापही पुराचा धोका कायम आहे. धरणांतील विसर्गामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
शहरात पंचगंगेची पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे. शनिवारी रात्रीपासून पाणी संथ गतीने वाढत असले तरी एक फुटाने वाढ झाल्यामुळे शहरातील विशेषत: गावभाग परिसरातील नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे स्थलांतराला वेग आला आहे.नदीवेस रस्त्यावरील श्री राम मंदिर परिसर, टिळक रोड याबरोबरच चांदणी चौक परिसर पाण्याखाली गेला.
पोलिस उपअधीक्षक कार्यालयासमोरील परिसर, माणगावकर बोळ, महादेव मंदिरासमोरील केडीसीसी बँक समोरील रस्ता, वैरण बाजार, चंदूर रोड आदी भागात पाणी पसरत चालले आहे. आवाडे अपार्टमेंट परिसरातही काही बंगल्यांमध्ये पाणी घुसले आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी शिरून मार्ग बंद होऊ लागल्यामुळे पोलिसांनी बॅरिगेड्स लावले आहेत. पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलालाही पाणी घासू लागले आहे. स्मशानभूमीही पूर्णत: पाण्याखाली गेली आहे. नेहमी गजबजलेल्या नदीवेस नाका व परिसरात आज आपत्कालीन सेवेच्या बोटी फिरताना दिसून येत होत्या. पाण्याचा शिरकाव वाढत असल्यामुळे दिवसभर गावभाग, टिळक रोड, जुना चंदूर रोड परिसरातील नागरिकांची साहित्य हलवण्यासाठी तारांबळ उडाली होती. पंचगंगा नदी सध्या धोका पातळीवरून वाहत आहे. गेल्या तीन दिवसांत पाणी पातळीत वाढ होत आहे. दुपारी एकपर्यंत पाणी पातळी 78.5 फुटांवर आली होती. धोका पातळीवरून 7 फुटांवरून पंचगंगा नदी वाहत आहे.
अत्यावश्यक सेवेसाठीच पेट्रोल
इचलकरंजी शहर व परिसरात अनेक पेट्रोल पंपांवर रविवारी वाहनधारकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. रुग्णालयात जाणार्या किंवा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी असणार्या वाहनांचाही पेट्रोल, डिझेलसाठी आटापिटा सुरू होता. बहुतांशी पंपांवर पोलिस बंदोबस्त होता. अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र पाहूनच इंधन दिले जात होते. शहरातील एका पेट्रोल पंप परिसरातही पाणी येऊ लागल्यामुळे तेथील इंधन वितरित करण्यात येत असल्यामुळे तिथे गर्दी झाली होती.
घुणकी परिसरात महापुराचे पाणी ओसरू लागले
किणी : पुढारी वृत्तसेवा
दोन दिवसांपासून घुणकीत ठाण मांडलेल्या महापुराचे पाणी ओसरू लागले आहे. महामार्गावरील वाहतूक रविवारी काहीअंशी सुरू करण्यात आली. दरम्यान, महामार्गावरील सहा पदरीचे नियोजन करताना सेवा रस्ते व रस्त्याखालून पाणी जाण्यासाठी बोगदे ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे केली.
हातकणंगले तहसीलदार प्रदीप उबाळे, माजी खासदार राजू शेट्टी, जि.प. सदस्य अशोकराव माने यांनी घुणकी येथे भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक आजही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. किणी टोल नाक्याच्या कोल्हापूरच्या दिशेला आलेले पाणी कमी झाले असून, टोल नाक्याजवळ थांबून राहिलेल्या अवजड वाहनांना पुण्याकडे जाण्यासाठी मार्ग खुला करण्यात आला.
किणीतील युवकांनी महापुरातही खोळंबून असलेल्या वाहनधारकांना व प्रवाशांना दोन वेळचे जेवण, चहा लहान मुलांना दूध व बिस्किटांचे वाटप केले. तसेच सैन्यदलातील एका गाडीतील जवानांची आस्थेवाईकपणे चौकशी करून राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली. यासाठी 'आम्ही किणीकर' ग्रुपच्या शांतिकुमार पाटील, संताजी माने, वैभव कुंभार, रणजित निकम, सुनील बांबवडे, नारायण कुंभार आदींनी परिश्रम घेतले.
कर्नाटक, सांगली, कोल्हापूरचा संपर्क बंदच
पाण्याची पातळी वाढल्यामुळे शहराचा आसपासच्या गावांसह कोल्हापूर, सांगली, मिरज व कर्नाटकच्या सीमाभागाशी संपर्क तुटला आहे. आगारातून सुटणार्या बसफेर्याही रद्द करण्यात आल्या आहेत, तर कर्नाटकातून येणारी बस वाहतूकही बंद आहे. दिवसभर इचलकरंजीकडे येणार्या नागरिकांची सोशल मीडियावर वाहतुकीसंदर्भात विचारणा सुरू होती. इचलकरंजीचा केवळ हातकणंगले, वडगाव, जयसिंगपूर व शिरोळशी संपर्क सुरू आहे. शिरढोण व टाकवडेकडे जाणार्या मार्गावर पाणी आले असले तरी सांगली नाका, मैलखड्डा परिसरातून या गावांशी संपर्क सुरू आहे.
गावभाग परिसर पाण्याखाली
इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा
इचलकरंजी शहरातील विशेषत: गावभाग परिसर पाण्याखाली गेला आहे. पाण्याच्या पातळीतही संथ गतीने का होईना वाढच होत असल्यामुळे अनेक घरांत पाणी शिरले आहे. त्यामुळे स्थलांतरितांची संख्या वाढत आहे.
शहरात सध्या 13 निवारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून, यामध्ये तब्बल 3489 नागरिकांनी आसरा घेतला आहे. मात्र यापैकी काही निवारा छावण्यांच्या ठिकाणी मोठ्या असुविधांना पूरग्रस्तांना सामोरे जावे लागत आहे. शौचालये, स्नानगृह तसेच पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी नागरिकांची धावाधाव होत आहे. आधीच पुरामुळे त्रस्त असताना सुविधाही मिळत नसल्यामुळे त्रासात भरच पडली आहे.
विशेषत: नदीजवळचा गावभाग परिसर ते जुना चंदूर रोड पर्यंतचा भाग पाण्याखाली गेला आहे. याचबरोबर आमराई परिसर पाण्यात आहे. याठिकाणच्या अनेक नागरिकांनी स्थलांतरासाठी गेल्या दोन दिवसांपासून अविरत प्रयत्न सुरू आहेत. अनेकांनी पाणी दारात येण्यापूर्वीच खबरदारीचा उपाय म्हणून इतरत्र आसरा शोधला आहे. पालिकेच्या वतीनेही नागरिकांसाठी आसरा देण्यासाठी छावण्या उभारण्यात आल्या आहेत.
सायंकाळपयर्यंत याठिकाणी आणखी काही नागरिकांचे स्थलांतर सुरूच होते. गतवर्षीपेक्षा यंदा निवारा छावण्यांची संख्या तोकडीच पडत आहे.
कोरोना संसर्गाचा धोका
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. पूरग्रस्तांची संख्या वाढत असल्याने छावणीमध्ये नागरिकांची गर्दी वाढत आहे. नाट्यगृह, गोविंदराव हायस्कूल, मंगलधाम, कलानगर शाळा आदी ठिकाणी गर्दीचे चित्र कायम आहे. नाट्यगृहातील एका संशयित वृद्धाला तातडीने कोव्हिड केंद्रात दाखल करण्यात आले. गर्दी कमी करण्यासाठी निवारा छावण्यांचीसंख्या वाढविण्याची गरज आहे; अन्यथा संसर्गाचा धोकाही अधिकआहे.
पूर पाहण्यासाठी गर्दी
इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा
इचलकरंजी शहरात गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळत आहे. परिणामी पुराचे पाणी नागरी वस्त्यांमध्ये दाखल झाले आहे.
मात्र, पूरस्थिती पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची गर्दी होत आहे. या गर्दीमध्ये नागरिक व प्रशासन दोघेही कोरोनाबाबतचेनिर्देश पालन करायचे विसरून गेल्याचे चित्र दिसत आहे. पूरग्रस्त नागरिकांचे स्थलांतर केलेल्या जागेमध्येही अशीच स्थिती असल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनापुढे दुहेरी संकट उभे राहिले आहे.
पावसाने उघडीप दिली तरी पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ कायम आहे. पूर पाहण्याठी नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे मोठी गर्दी होत आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. मात्र, पूर पाहण्याच्या धांदलीत नागरिकांना कोरोना संसर्गाचा विसर पडलेला दिसत आहे. अनेकजण विनामास्क फिरत आहेत, तर कारवाई करणारे प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. परिणामी कोरोना संसर्ग पुन्हा पसरण्यास पोषक वातावरण झाल्याचे दिसत आहे.
शहरात गतवर्षापासून कोरोना महामारीने थैमान घातले आहे. आजही सरासरी 30 च्या पटीमध्ये बाधित रुग्ण आढळून येत आहेत. मे महिन्यामध्ये बाधितांच्या मृत्यूची संख्या राज्यात अधिक होती. आता बाधितांचे प्रमाण कमी होत असताना पुराचे थैमान सुरू आहे. शहरात पूरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांसह प्रशासनाने कोरोना संसर्गाकडे काहीसे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. कोरोनाबाबत शहराची पूर्व परिस्थिती पाहता शासन निर्देशांचे पालन करणे गजेचे बनले आहे.