Latest

इचलकरंजी : जर्मनी गँगच्या टोळीचा यंत्रमागधारकावर हल्ला

Arun Patil

इचलकरंजी ; पुढारी वृत्तसेवा : जर्मनी गँगच्या टोळीने मोबाईलची मागणी करीत साईनाथनगर परिसरात राहणार्‍या रमेश रघुनाथ गोटखिंडे या यंत्रमागधारकाच्या घरावर हल्‍ला केला. यावेळी दहशत माजवत गोटखिंडे कुटुंबीयांना सळी व बॅटने मारहाण केली. त्यामध्ये रमेश यांच्यासह त्यांच्या पत्नी नीता, भाऊ राकेश गोटखिंडे असेे तिघेजण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्री घडली.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रोहित मांडे, रोहन मांडे (दोघेही रा. शास्त्री सोसायटी), सुमित प्रदीप परीट, अक्षय कदम, आशिष जमादार (सर्व रा. साईनाथनगर) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टोळीने दगडफेक केल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती.

रमेश गोटखिंडे साईनाथनगर येथे राहतात. त्यांच्या आईचे उत्तरकार्य आटोपून ते घरी झोपले होते. या दरम्यान त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावत संशयित टोळक्याने आम्ही जर्मनी गँगचे असून, तुमचा पुतण्या, पप्प्या कुठे आहे? माझा मोबाईल त्याच्याकडे आहे. तो हवा आहे, असे म्हणत शिवीगाळ करून दहशत निर्माण केली.

यावेळी रमेश यांच्या पत्नी नीता, वहिनी मेघा राजेश गोटखिंडे तेथे आल्या. त्यांच्या लहान भावांनीही संशयितांना दारात अडवले. त्यावेळी संशयितांनी सळी तसेच बॅटने मारहाण करण्यास सुरुवात केली.

आरडाओरडा ऐकून नागरिक जमा झाल्याचे पाहून रोहन मांडे याने मुलांना ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी पलायन केले. शिवाजीनगर पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT