Latest

इचलकरंजी : कुणी अडवलं पाणी, कुणी रेल्वे…

Arun Patil

इचलकरंजी, संदीप बिडकर : महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून इचलकरंजीची ओळख आहे. शहरात वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून सुमारे 100 कोटींची उलाढाल रोज होते. अनेकांना रोजगार देणारे शहर म्हणून पश्चिम महाराष्ट्रात या शहराची ओळख आहे.मात्र इचलकरंजीला मंजूर झालेल्या योजनांना खो घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

परिणामी, शहराला पाणी मिळण्यासाठीचा संघर्ष कित्येक वर्षे सुरू आहे. आता मंजूर असणारा 9 किलोमीटरच्या रेल्वे मार्गालाही परिसरातील नागरिकांनी विरोध केला आहे.

गेले दशकभर शहर पाण्यासाठी टाहो फोडत आहे. राजकीय नेत्यांनी योजना मंजूरही करून आणल्या. परंतु, वारणा पाणी योजनेला वारणा काठावरील नागरिकांनी विरोध केल्यामुळे ती योजना बंद करावी लागली. सध्या सुळकूड योजना सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रयत्नाने मंजूर झाली. परंतु, कर्नाटक सीमाभाग, कागल, करवीर व शिरोळ तालुक्यांतील दूधगंगा नदीकाठावरून जोरदार विरोध होत आहे. पाणी देणार नाही, असा नारा देत संबंधितांनी नेताविरहीत जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून सोडले. त्यामुळे सध्यातरी ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय कौशल्य पणाला लावण्याची गरज निर्माण झाली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी 2017 रोजी कराड येथून व्ही.सी.द्वारे भूमिपूजन केलेला हातकणंगले-इचलकरंजी रेल्वेमार्गाच्या कामाला मुहूर्त मिळाला नाही. इचलकरंजी शहरातील रेल्वे कृती समितीच्या वतीने सुमारे दशकाहून अधिक काळ रेल्वेसाठी पत्रव्यवहार व मागणी सुरू होती. परंतु, सध्या हातकणंगले, कोरोची, कबनूर येथील ग्रामस्थ, शेतकर्‍यांनी रेल्वेविरोधी कृती समितीद्वारे आपला विरोध तीव्र केला. त्यामुळे इचलकरंजीकर हवालदिल झाले आहेत.

इचलकरंजीला रेल्वे व्हावी, यासाठी व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते यांनी सुमारे 10 हजार पत्रे रेल्वे मंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत तसेच मुख्यमंत्र्यांपासून संबंधित कार्यालयांना पाठवून भावनिक साद घातली आहे.

शहरामध्ये रोज सुमारे 400 ट्रकची आवक-जावक होते. येथील तयार माल देशाच्या कानाकोपर्‍यात जात असल्यामुळे रेल्वेमुळे याची वाहतूक सुलभ व स्वस्त होणार आहे. शहरवासीयांना याचा फायदा होणार हे निश्चित आहे. परंतु, परिसरातील गावांचा विरोध लक्षात घेता पाणी योजनांप्रमाणे रेल्वेही धोक्यात येते की काय, अशी शंका शहरवासीयांतून उपस्थित केली जात आहे.

शहराने अनेकांना रोजगार दिला. सध्या महापालिकाही झाली आहे. विस्तार वेगाने होत आहे. त्यामुळे रेल्वेचे जाळे शहरात असणे सर्वांसाठीच सोयीचे होणार आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

राजकीय नेतृत्वाची कसोटी

शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न व प्रस्तावित रेल्वे या दोन्हीचे निराकरण करण्यासाठी सक्षम राजकीय नेतृत्वाबरोबरच प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाणी प्रश्नाबाबत विरोधकांना भूमिका समजावून सांगून तसेच रेल्वेच्या विरोधातील गावातील नागरिकांची भूमिका समजावून त्याबाबतही तोडगा काढण्याचे कसब राजकीय नेतृत्वाने पणाला लावणे गरजेचे आहे, तरच हे दोन्ही प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT