आषाढी वारी 
Latest

पंढरपूर : आषाढी वारीत ड्रोन कॅमेर्‍यास बंदी

backup backup

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा आषाढी यात्रा कालावधीत यंदा 12 ते 14 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेर्‍याद्वारे टेहळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायामध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याने वारीत ड्रोन कॅमेर्‍याद्वारे छायाचित्रण करण्यास बंदी घातल्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी शमा पवार यांनी जाहीर केले आहेत.

30 जून ते 13 जुलै 2022 या आषाढी वारी कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज, संत श्री निवृत्तीनाथ महाराज, संत श्री सोपानदेव महाराज, संत श्री नामदेव महाराज, संत श्री एकनाथ महाराज, संत श्री मुक्ताबाई व संत श्री गजानन महाराज या मानांच्या पालख्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येणार आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्र आणि इतर प्रांतांतून लाखो भाविक/ वारकरी येतात. 9 जुलै 2022 रोजी सर्व पालख्या पंढरपूर येथे एकत्र येतात. लाखो भाविक मंदिर परिसरात एकाच ठिकाणी एकत्र आलेले असतात. या काळात नदी घाटावर, मंदिर परिसर, पालखी मार्गावर टी.व्ही. चॅनल्स, खाजगी व्यक्ती, संस्था यांच्याकडून पालखी सोहळ्याचे छायाचित्रण होत असते. दहशतवादी घटनांचा विचार करता ड्रोन कॅमेर्‍याद्वारे छायाचित्रण करून त्याचा दुरूपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वारीमध्ये जास्तीत जास्त भाविक ग्रामीण भागातील असल्याने त्यांना ड्रोनची कल्पना नसते, छायाचित्रण केले तर वारकर्‍यांमध्ये अफवा पसरून गोंधळ उडून चेंगराचेंगरा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा प्रशासनाने (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) 30 जून ते 13 जुलै 2022 अखेर पालखी सोहळ्याच्या संपूर्ण मार्गावर आणि पंढरपूर येथील आषाढी वारीमध्ये ड्रोन कॅमेर्‍याद्वारे छायाचित्रण करण्यावर बंदी घातली असल्याचे पवार यांनी आदेशात म्हटले आहे.

अनोळखी व्यक्तीबाबत दक्षता

आषाढीवारी कालावधीत फ्लॅट, लॉज, मठ, धर्मशाळा, चर्च, मशिद, मंदिर व खासगी निवासस्थाने याठिकाणी अनोळखी अथवा संशयित इसमास त्याची ओळख पटवल्याशिवाय राहण्यास परवानगी देवू नये. भाडेकरुकडून रहिवाशी व ओळख असलेला पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती घ्याव्यात. आषाढी वारी कालावधीत स्फोटक पदार्थ, बार उडणारे पदार्थ सोबत बाळगू नये. तसेच गॅस, केरोसीन, डिझेल, पेट्रोल याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करून सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT