कडेगाव : संदीप पाटील गेल्या काही दिवसांपासून आले व हळद दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे कडेगाव तालुक्यात आले व हळद लागवडीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे चित्र आहे. शेतकर्यांनी अन्य पिकांचा पर्याय निवडला आहे. कडेगाव तालुक्यात ताकारी व टेंभूचे पाणी आल्यापासून शेतकरी ऊस शेतीबरोबर शेतात नवनवीन प्रयोग करू लागले आहेत. परिणामी भाजीपाला, आले याबरोबरच हळद लागवडीत वाढ झाली आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपूर्वी आले व हळदीला चांगला दर मिळाल्याने कडेगाव तालुक्यात आले व हळद लागवडीत 70 ते 90 हेक्टरपर्यंत वाढ झाली होती.
परंतु गेल्या तीन ते चार वर्षांपासून आले व हळदीच्या दरात सातत्याने मोठी घसरण होत असल्याने शेतकरी दराअभावी हवालदिल झाला आहे. आले व हळद बियाणे खरेदी करून लागणीपासून ते काढणीपर्यंत शेतकर्यांना मजुरी, खते, औषधे यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागत असतो. तसेच काढणीनंतरही हळद यंत्राच्या साह्याने शिजवणे, पॉलिस करणे यासाठी शेतकर्यांना किमान 80 ते 90 हजार रुपयांपर्यंत खर्च येत असतो. परंतु सध्या बाजारपेठेत आले व हळदीला योग्यतो भाव मिळत नसल्याने शेतकर्यांना घातलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.
तालुक्यातील बहुतांशी शेतकर्यांनी दराअभावी व वाहतुकीअभावी हळद विक्री न करता त्याची साठवणूक करून ठेवल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आर्थिक कचाट्यात सापडला असून त्याच्यावर लाखो रुपये कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. कोरोनामुळे आधीच शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतातील भाजीपाल्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल बनला आहे. शेतकर्यांसमोर बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न सध्या समोर उभा आहे. त्यामुळे शासनाने आले व हळदीला क्विंटला किमान 20 ते 25 हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी उत्पादक शेतकरीवर्गातून जोर धरू लागली आहे.