Latest

लवंगी मिरची : आलीया भोगासी असावे..!

backup backup

आदरणीय मुख्याध्यापक महोदय, स.न. सर, तुम्ही माझ्या मुलाची तक्रार करणारे पत्र पाठविलेत यासाठी प्रथम आभार! पाचवीत शिकणारा माझा मुलगा फार खट्याळ आणि खोडकर आहे, हे मला मान्य आहे. अर्थात, तुमची तक्रार रास्त आहेच; पण मग त्याला शिस्त लावण्यासाठी शाळेने काय केले, हा प्रश्न उरतोच. तो वर्गातील इतर मुलांना त्रास देतो आणि शिक्षकांना अध्यापनात व्यत्यय आणतो, असेही तुम्ही या तक्रारीत म्हटलेले आहे. याबद्दल माझ्या मनात अजिबात संदेह नाही. त्याची आई, मामा, मावश्या आणि तिकडचे आजी-आजोबा यांच्या त्रासामुळे मी स्वतःच खूप त्रासून गेलो असून, 'आलीया भोगासी असावे सादर' या न्यायाने सहन करतो आहे. माझा मुलगा आणखी पाच वर्षांत शाळा सोडून जाईल; पण माझा त्रास जन्माचा आहे हे लक्षात घेतल्यास तुम्हाला माझ्याबद्दल सहानुभूती वाटेल असा मला विश्वास आहे.

आपली शाळा एक प्रतिष्ठित आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आहे आणि अशा ख्यातकीर्त शाळेत माझा मुलगा शिक्षण घेतो याचा मला अभिमान आहे. माझा मुलगा लहानपणापासून उनाडक्या करतो, त्याअर्थी मोठेपणी तो फार मोठा झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे. याबाबतीत आपल्याला न्यूटन, लिंकन, अ‍ॅरिस्टॉटल यांची चरित्रे वाचावी लागतील. अगदीच काही नाही जमले तर तो आमदार किंवा नगराध्यक्ष होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एक ना एक दिवस तो तुमच्याच शाळेत येऊन झेंडावंदन करेल, ही शक्यताही आपण ध्यानात घ्यावी ही विनंती. शालेय जीवनात व—ात्य असणार्‍या कित्येकांनी पुढे असंख्य शाळा कॉलेजिस आणि इतर शिक्षण संस्थांची स्थापना करून शिक्षणमहर्षी म्हणून नाव कमावलेले आपण नेहमी पाहतो. असे काही कर्तृत्व माझ्या मुलाने भावी आयुष्यात दाखविले तर तो तुमचा आणि माझा दोघांचाही गौरव असेल.

सर, स्काऊटच्या 'खरी कमाई' या उपक्रमात जमा झालेल्या पैशांचा त्याने अपहार केला, असा आपल्या पत्रात नमूद केलेला मुद्दा वाचून मी अगदीच हरखून गेलो आहे. माझी अवस्था 'आनंद पोटात माझ्या माईना रे माईना' अशी झाली आहे. अपहार, अफरातफर, भ—ष्टाचार या शब्दांची बालपणी ओळख नसल्यामुळे भविष्यात बरेच लोक असे प्रकार करताना अडकतात हे आपण नेहमी पाहतो. अशा परिस्थितीत घोटाळा करून बालपणीच आपले पाय भानगडीत गुंतल्याचे दाखविणारा माझा मुलगा बिनबोभाट लोकांचे खर्‍या कमाईचे, म्हणजेच बँकांचे पैसे घेऊन आकाशमार्गे इतर देशामध्ये आरामात जाऊन मजा करेल, हे मला स्पष्ट दिसते आहे.

सर, एकंदरीतच व्यक्तीच्या शालेय जीवनाचा आणि भावी आयुष्यातील कर्तृत्वाचा काहीही संबंध सांप्रत काळामध्ये राहिलेला नाही हे तुम्हीही मान्य कराल अशी मला आशा आहे. माझ्या स्वतःच्या शाळेत माझी कधी तक्रार झाली नाही, मी कधीही गैरहजर राहिलो नाही की, कधी शिक्षकांना त्रास दिला नाही. नियमित शिक्षण घेऊनही शेवटी असंख्य वशिले लावून पिताश्रींच्या कृपेने एका पतपेढीमध्ये कारकून म्हणून कसाबसा लागलो. तुम्हीही विद्यार्थी म्हणून शिस्तशीर, वक्तशीर आणि अभ्यासू असाल याविषयी मला शंका नाही. मुलांवर आधुनिक संस्कार केले पाहिजेत, असे मला वाटते. आपल्या पत्रामुळे माझ्या मुलाकडून फार मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्याचे भवितव्य उज्ज्वल आहे, याबाबत मला कसलीही शंका उरलेली नाही. असो. या पत्रामुळे तुमच्याही बर्‍याचशा शंकांचे निरसन झाले असेल, अशी आशा बाळगतो.
धन्यवाद !
आपला आभारी : एक अतिजागरूक पालक

  • झटका 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT