Latest

आला दिवस, गेला दिवस!

अमृता चौगुले

ए, आज तुझा दिवस आहे ना?
मला तर रोजच माझा दिवस असावा असं वाटतं बरं का!
हरकत नाही, पण आज खराखरा स्पेशल दिवस आहे ना? मग आज तू आपली पूर्ण आराम कर बरं.
म्हणजे कसा?

आज सरळ सुट्टी घे तू घरकामाला. तू फक्त गॅसवर चहाचं आदण ठेव. मी गॅस पेटवतो. तू कुकरची तयारी कर. मी शिट्ट्या मारतो, आपलं, मोजतो. तू गादी घाल, मी झोपतो.
अरे वा! झालीच की माझी सुट्टी आणि तुमची मोठ्ठी मदत!
नुसती कृती बघू नकोस, भावना पण बघ त्यामागच्या. ऑपलं बुवॉ ऑसं आहे, ज्यॉचा दिवस त्यॉलॉ वॉहायचॉ.
म्हणजे एरवी उंडारायला मोकळे का?
बघ. हे ओसं करतॉ तुम्ही बायकाे. दिवसाचं महत्त्वच नाहीच जसं काही.
पण आम्हाला संपूर्ण आयुष्याचंच महत्त्व असेल तर?
आमच्या ऑफिसमध्ये आज पैठणीचा खेळ पण ठेवलाय, खास महिला कर्मचार्‍यांसाठी.
पैठणीचं ठीक आहे, पण एरवी नोकरीत सन्मानाने वागवता का बायकांना? उगाच त्यांच्या कामात चुका काढणं, टिंगल करणं, सहकार्य न करणं टाळता?

करतो बहुधा.एखादी बाई बॉस म्हणून आली तर चालते? का लगेच मिरच्या झोंबतात नाकाला?
चालवून घ्यावं लागतं आता. इतक्या बायका इतकं काय काय शिकतात, करिअर करतात म्हटल्यावर ती वेळ येणारच ना पुरुषांवर?
असं नाईलाजाने नको. उमदेपणाने, उत्साहाने दाद देता यायला हवी. हे माझं म्हणणं आहे.

आता घ्या! तू फसक्लास कोंबडीवडे केलेस, तर्रीदार मिसळ खावी तर तुझ्याच हातची, असं म्हणत नाही का मी?
हो तर! पण एखाददा माझी भट्टी बिघडली तर चिडचिडही करता. माणूस आहे म्हटल्यावर कामाचं उन्नीस-बीस होऊ शकतंच ना कधी कधी? ती सवलत मला का नसावी? मी बाई आहे, बायको आहे म्हणून?

तरी बरं. आमटी तिखट झाली म्हणून बायकोला पळी फेकून मारणार्‍यांपैकी मी नाहीये. अशा नवर्‍यांच्या बातम्या काय थोड्या येतात पेपरला? त्याठिकाणी आमच्या सामंजस्यपणाचं कौतुक करायचं राहिलं दूरच. वर तुम्ही आम्हालाच शिकवा.
शिकवत नाही हो. साधी अपेक्षा करतेय. माझ्याकडून अवास्तव अपेक्षा करणं बंद करा. मीही माणूस आहे, मलाही थकवा येतो, कंटाळा येऊ शकतो, मलाही बदल हवासा वाटतो, आपल्यातले गुण लोकांपुढे आणावेसे वाटतात हे कधी समजणार तुम्हाला?
आज आठ मार्च. जागतिक महिला दिन. तेव्हा आज तरी नक्की घेईन समजून.
आणि उद्यापासून 'पहिले पाढे पंचावन्न' का? बैलपोळ्याच्या दिवशी दिवसभर बैलांना सजवायचं, पुरणपोळ्या चारायच्या आणि दुसर्‍या दिवसापासून छाती फुटेपर्यंत कामाला जुंपायचं असं नकोय व्हायला.

मग कसं व्हायला हवंय? सांगून टाक एकदा. पुढे तसं वागायचं की नाही हे मी बघेन. कर सुरू. तुझं नारीदिवसाचं नेहमीचं आख्यान. मुलगी शिकली, प्रगती झाली वगैरे, वगैरे! मी फार काही सांगणार नाही हो. हुंडा, गर्भपात, बलात्कार असे मोठे प्रश्न तर उच्चारणारही नाही. मी फक्त एवढंच मागेन की बायकांना माणूस म्हणून वागवा. शत्रू, दास, गुलाम, पाळीव प्राणी म्हणून वागवणं थांबवा. त्याशिवाय महिला दिनाची 'आला दिवस, गेला दिवस' ही अवस्था कशी थांबेल? सांगा बरं?

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT