Latest

आरटी-पीसीआर पेक्षाही वेगवान कोरोना टेस्ट विकसित

Arun Patil

लंडन : ब्रिटिश वैज्ञानिकांनी आरटी-पीसीआर टेस्टला एक नवा पर्याय विकसित केला आहे. पुढील तीन महिन्यांनी ही नवी टेस्ट लोकांसाठी उपलब्ध होऊ शकेल. यामध्ये 'आरटी-पीसीआर' प्रमाणाचे स्वॅब सॅम्पलची तपासणी केली जाईल; पण तिचा निष्कर्ष अवघ्या तीन मिनिटांमध्येच दिसून येईल! संबंधित व्यक्ती कोरोना संक्रमित आहे की नाही म्हणजेच पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे केवळ तीनच मिनिटांत ही चाचणी सांगू शकेल.

बर्मिंघम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी ही नवी चाचणी विकसित केली आहे. त्यांचा दावा आहे की ही चाचणी आरटी-पीसीआर टेस्टपेक्षा अधिक वेगवान तसेच अचूक निष्कर्ष देते. या नव्या टेस्टला 'आरटीएफ-इएक्सपीएआर' असे नाव देण्यात आले आहे. संशोधकांनी एक असे उपकरण तयार केले आहे जे कोरोनाचा त्याच्या जनुकीय सामग्रीच्या आधारे छडा लावते.

तपासणीसाठी घसा किंवा नाकातून घेतलेल्या नमुन्याला या उपकरणामध्ये ठेवले जाते व हे उपकरण कोरोना विषाणूचे निदान करते. विमानतळांसारख्या ज्या ठिकाणी वेळ अतिशय कमी असतो तिथे झटपट अचूक निदान करणार्‍या या चाचणीचा चांगला उपयोग होऊ शकतो. अशा अनेक ठिकाणी कोव्हिडची फास्ट स्क्रीनिंग होऊ शकेल. युनिव्हर्सिटीज स्कूल ऑफ बायोसायन्सेजच्या प्रा. टीम डॅफ्रन यांनी सांगितले की सॅम्पलमध्ये व्हायरल लोड कमी असला तर रिझल्ट येण्यासाठी आठ मिनिटांचाही वेळ लागू शकतो.

तसेच व्हायरल लोड अधिक असल्यास अवघ्या 45 सेकंदातही रिझल्ट मिळू शकतो. संशोधक अँड्र्यू बेग्स यांनी सांगितले की आरटी-पीसीआरच्या तुलनेत ही नवी चाचणी कुठेही कमी नाही, उलट अधिक सरसच आहे. पॉझिटिव्ह सॅम्पलपासून 89 टक्के आणि निगेटिव्ह सॅम्पलपासून 93 टक्क्यांपर्यंत अचूक माहिती मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT