सोलापूर : पुढारी वृत्तसेवा शिवसेना पक्षाला सध्या बंडखोरीचे मोठे ग्रहण लागले असून दिवसेंदिवस एक-एक आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील होत चालले आहेत. त्यामुळे मूळ शिवसेेनेला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या विविध पदाधिकार्यांकडून फुटणार्या पदाधिकार्यांवर आणि लोकप्रतिनिधींवर आगपाखड केली जात आहे. मात्र, बंडखोरांकडून यांना कोणतेही प्रत्युत्तर दिले जात नाही, तर उलट आम्हीच निष्ठावंत शिवसैनिक असून स्व. बाळासाहेब ठाकरे आणि स्व. आनंद दिघे यांच्या भूमिकेशी ठाम असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे राज्यभर पडसाद उमटले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून नव्याने एकप्रकारे सर्व्हेच हाती घेतला असून यामध्ये राज्यभरातील शिवसैनिक तसेच सर्वसामान्य नागरिकांकडून समर्थनपत्रे लिहून घेण्याची मोहीम आखली आहे.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून एक अर्जाचा नमुना तयार करण्यात आला आहे. यामध्ये हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. आनंद दिघे यांनी शिवसेनेसाठी दिलेले योगदान आणि त्यांनी केलेला त्याग, त्यांनी मांडलेल्या विचारांशी आम्ही एकनिष्ठ आणि ठाम आहोत. त्यांच्या प्रखर हिंदुत्वाचा विचार आम्ही ठामपणे पुढे घेऊन जात आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली राजकीय भूमिका ही योग्य आहे. त्यांच्या पुढील कार्यायासाठी मी एक शिवसैनिक म्हणून तसेच सर्वसामान्य नागरिक म्हणून माझे त्यांना पूर्ण समर्थन राहणार आहे. त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. असा मजकूर त्यामध्ये लिहून त्याखाली सही आणि मोबाईल नंबर देण्यात येणार आहे. ती मोहीम आता संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे समर्थक लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे मूळ शिवसेनेत एकनाथ शिंदे समर्थकांवर कारवाई केली जात आहे, तसेच त्यांना पदावरून काढण्याचा सपाटा लावला आहे, मात्र दुसरीकडे शिंदे यांना शिवसेनेतूनच मोठ्या प्रमाणावर समर्थन वाढत चालले आहे.तसेच, जिल्ह्यातील अनेक आमदार, खासदार, माजी मंत्री, नगरसेवक संपर्कात असल्याचेही लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांनी सांगितले आहे