कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आमदार चंद्रकांत जाधव यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे असेल, तर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी. त्याला भारतीय जनता पक्षाने मोठे मन दाखवून बिनविरोध करावे, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. आ. जाधव यांचे शाहू मिलच्या जागेत स्मारक उभारण्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी स्वत:चे पंधरा लाख रुपये खर्चून आराखडा तयार करून घेतला आहे. त्याचे काम आम्ही पूर्ण करू, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाबद्दल शनिवारी काँग्रेस कमिटीमध्ये सर्वपक्षीय शोकसभेत ते बोलत होते. यावेळी अनेक वक्त्यांनी आ. जाधव यांच्या आठवणी सांगत त्यांचे उचित स्मारक व्हावे, अशी मागणी केली.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, उद्योगासाठी कमी दरात विद्युत पुरवठा व्हावा, शाहू मिलमध्ये शाहू स्मारक व्हावे, हद्दवाढ याकरिता ते सतत आग्रही होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. त्यासाठी जयश्रीताई जाधव यांना बिनविरोध करावे.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, खिलाडूवृत्तीचे आ. जाधव मॅच अर्ध्यावर सोडून गेले. कामगारांचे आणि त्यांचे नाते कसे होते, हे अंत्ययात्रेत दिसून आले. सामान्य माणसाला पायावर उभे राहण्याचे बळ त्यांनी दिले. खेळाडूंना मदत केली. एक द़ृष्टिकोन घेऊन ते राजकारणात आले होते. हुतात्मा गार्डन, महावीर गार्डन अद्ययावत करण्यासाठी त्यांनी बेंगलोरमधील तज्ज्ञ बोलावले होते. त्यांच्याकडे कल्पकता होती. शहराचा विकास हाच त्यांचा ध्यास होता. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबांवर आघात झाला आहे. त्यामुळे जाधव कुटुंबीयांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे. शाहू मिल जागेतील स्मारकाचे काम लवकर पूर्ण करू.
आ. पी. एन पाटील म्हणाले, आ. जाधव यांनी नेहमीच राजकारण विरहित काम केले. ग्रामीण भागातील खेळाडूंनादेखील त्यांनी मदत केली.
शाहू मिलच्या जागेवर अॅम्युजमेंट पार्क उभारण्याचे जाधव यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करावे. याशिवाय त्यांचे तीन-चार महत्त्वाचे विषय होते त्यासाठी समिती स्थापन करावी, असे राहुल चिकोडे म्हणाले.
फुटबॉल अॅकॅडमी स्थापन करावी
आ. जाधव स्वत: फुटबॉल खेळाडू होते. त्यांनी अनेक खेळाडू निर्माण करण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने फुटबॉल अॅकॅडमी स्थापन करून खेळाडू तयार करावेत, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले.
दिल्लीसारखी मनपाची शाळा करावयाची होती
दिल्लीतील सरकारी शाळा पाहून कोल्हापूर महापालिकेच्या शाळा तशा करण्याचा जाधव यांचा प्रयत्न होता. परंतु, ते त्यांचे स्वप्न आता अपुरेच राहिले आहे, असे आ. जयंत आसगावकर यांनी सांगितले.
उद्योगाच्या विकासासाठी तळमळ ( आमदार चंद्रकांत जाधव )
आ. जाधव यांची औद्योगिक विकासाठी खूप तळमळ होती. त्यांचा राजकीय प्रवास खूप कमी कालावधीचा आहे; परंतु तो सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा आहे. कोणतेही काम असो, त्याचा दर्जा चांगला असला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा, असे आ. प्रकाश आवाडे यांनी सांगितले.
प्रचंड लोकसंग्रह
शांत, मितभाषी असणारे आ. जाधव यांचा राजकारणातील प्रवास फार कमी आहे, तरीही त्यांचा लोकसंग्रह प्रचंड मोठा होता, हे त्यांच्या अंत्ययात्रेच्या निमित्ताने आपण पाहिले. खेळाडू, उद्योजक, राजकरणी या त्यांच्या प्रवासात कोल्हापूरची ओळख मोठी झाली पाहिजे, असा सतत त्यांचा ध्यास होता, असे खा. संजय मंडलिक म्हणाले.
आ. राजू आवळे, माजी आ. सुचित मिणचेकर, कॉ. दिलीप पवार, बाबुराव कदम, चंद्रकांत यादव, अॅड. गिरीष खडके, वसंत मुळीक, माणिक मंडलिक, अशोक भंडारे, कादर मलबारी, 'गोकुळ'चे अध्यक्ष विश्वास पाटील, निलोफर आजरेकर, बाबा पार्टे, सरलाताई पाटील यांची भाषणे झाली.
जि. प. अध्यक्ष राहुल पाटील, व्ही. बी. पाटील, सुरेश जरग, अॅड. संपतराव पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवसेना शहरप्रमुख जयंत हारुगले आदी उपस्थित होते.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांनी आभार मानले.
अतिदक्षता विभागातून मंत्र्यांना फोन
शस्त्रक्रिया करण्याच्या आदल्या दिवशी अण्णांनी अतिदक्षता विभागातून उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना फोन केला होता. एवढी तळमळ असणार्या एका चांगल्या व्यक्तीला आपण मुकलो आहोत, असे पालकमंत्री पाटील म्हणाले.
काँग्रेसच्या काही लोकांना भाजपने बिनविरोध केले : मुश्रीफ
भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत काँग्रेसच्या काही उमेदवारांना बिनविरोध केले आहे. त्याप्रमाणे जयश्री जाधव यांच्या बाबतीतही भाजपने मोठे मन दाखावावे आणि त्यांना बिनविरोध करावे, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.