सिडनी : जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी म्हणजे आफ्रिकन हत्ती. या देखण्या आणि भव्य प्राण्यांची घटती संख्या आता चिंतेचे कारण बनू लागले आहे. आफ्रिकन हत्तींची संख्या 1800 च्या दशकात सुमारे 2.6 कोटी होती. आता ती 4 लाख 15 हजार झाली आहे. युरोपियन वसाहतवाद, अवैध शिकार आणि नैसर्गिक अधिवासांचे नुकसान यामुळे बर्याच अंशी ही स्थिती उद्भवली असल्याचे तज्ज्ञांना वाटते. सध्या या प्रजातीला आणखी एका गंभीर आव्हानाचा सामना करावा लागत आहे. हे आव्हान आहे हवामान बदलाचे. यामुळे आफ्रिकेच्या बहुतांश भागात दुष्काळाची समस्या दीर्घ आणि अधिक गंभीर बनत चालली आहे.
दुष्काळामुळे हत्तींच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होत असतो. पाणी ही मूलभूत गरज आहे आणि त्यापासूनच हे विशाल जीव वंचित होऊ लागतात. आपल्या अवाढव्य शरीरामुळे अफ्रिकन हत्तींना जिवंत राहण्यासाठी रोज शेकडो लिटर पाण्याची आवश्यकता असते. सध्या अफ्रिकन सवाना हत्ती हे तर लुप्तप्राय प्राण्यांच्या यादीतही समाविष्ट झालेले आहे.
ही स्थिती बदलली नाही, तर अफ्रिकाच नव्हे तर संपूर्ण जगच या महत्त्वाच्या प्राण्याला गमावून बसू शकते. हे हत्ती लुप्त झाले, तर त्याचे पर्यावरणावरही दूरगामी परिणाम होऊ शकतात. अफ्रिकेतील बर्याच प्रकारची नैसर्गिक स्थिती ही या प्राण्यांच्या जीवनाच्या आसपास फिरत असते.
हत्तींच्या खाण्यापिण्याच्या सवयी उदा. झाडांना धक्का देणे, साल काढणे या जंगली वनस्पतींना गवताच्या मैदानात बदलू शकतात. त्यामुळे छोट्या प्रजातींना येण्या-जाण्यासाठी जागा होत असते. कोरड्या नदीच्या पात्रात हत्ती पायाने माती खोदून आतील पाण्याचा स्रोत उघड करीत असतात. त्यामुळे त्यांचीही तहान भागते, शिवाय अन्यही वन्य प्राण्यांना उन्हाळ्याच्या किंवा दुष्काळी दिवसात मदत होते. हवामान बदलामुळे दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत दीर्घकाळापासून दुष्काळी स्थिती आहे. काही भागात तर गेल्या वीसपेक्षाही अधिक वर्षांपासून दुष्काळ आहे. पाण्याच्या या कमतरतेचा आफ्रिकन हत्तींना बसला आहे.