केनेथ कौंडा 
Latest

आफ्रिकन गांधी : केनेथ कौंडा

Arun Patil

अक्षय शारदा शरद

आफ्रिकेतल्या झांबिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष केनेथ कौंडा यांचं नुकतेच निधन झालं. तब्बल 27 वर्षे या देशाची सूत्रं त्यांच्या हातात होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाला सुरुंग लावत त्यांनी आफ्रिकेला आधुनिकतेची वाट दाखवली. महात्मा गांधींजींचा अहिंसक विचार ही त्यांच्या लढ्याची प्रेरणा बनली. त्यामुळेच त्यांना आफ्रिकन गांधी असं म्हटलं जातं.

आफ्रिकेला गुलामगिरीचा मोठा इतिहास आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या वास्तव्यात त्याचे चटके महात्मा गांधींनाही बसले होते. त्याला विरोध करत या अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं बळ त्यांनी तिथल्या भारतीयांना दिलंच; पण भारतात येऊन ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात आंदोलन पुकारलं. हेच आंदोलन जगभरच्या अनेक देशांसाठी प्रेरणा बनलं. नेल्सन मंडेलांनी महात्मा गांधीजींच्या लढ्याची प्रेरणा घेत दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेषाविरोधात लढा उभारला.

पूर्व आफ्रिकेतला झांबिया म्हणजेच तेव्हाचा उत्तर होडेशिया हा भाग तब्बल 50 वर्षे ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली होता. गांधीजींच्या प्रेरणेनं ब्रिटिशांचं हे अर्धशतकी वर्चस्व मोडीत काढलं ते पेशानं शिक्षक असलेल्या केनेथ कौंडा यांनी. त्यामुळेच त्यांना आफ्रिकन गांधी असं म्हटलं जायचं. त्यांनी आफ्रिकेतल्या ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाला सुरुंग लावला.

कौंडा यांचं मागच्या महिन्यात 17 जूनला निधन झालं. झांबियाला स्वातंत्र्य मिळाल्यावर तब्बल 27 वर्षे केनेथ या देशाचे राष्ट्राध्यक्ष राहिले. आफ्रिकेला आधुनिकतेची वाट दाखवणार्‍या नेल्सन मंडेला यांच्याबरोबरीनं त्यांचं नाव घेतलं जातं.

केनेथ डेविड कौंडा यांचा जन्म 28 एप्रिल 1924 ला तेव्हाच्या उत्तर होडेशियातल्या लुब्वे मिशन इथं झाला. त्यावेळी हा सगळा भाग ब्रिटिशांच्या वर्चस्वाखाली होता. त्यांचे वडील स्कॉटलँड मिशनरी चर्चमधे पाद्री तसंच शिक्षक होते. त्यांची आईही आफ्रिकन महिला असलेली पहिली शिक्षिका होती.

लहान असतानाच केनेथ यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पुढे त्यांनी उत्तर होडेशियातून प्राथमिक शिक्षण घेतलं. इथूनच माध्यमिक शिक्षणही पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर सुरवातीला उत्तर होडेशिया आणि 1940 च्या दशकात टांझानिया अर्थात तेव्हाच्या टांगानिका इथं शाळेत शिकवायला सुरवात केली. वयाच्या तिशीपर्यंत त्यांनी शिक्षकाची नोकरी केली होती.

केनेथ 1949 मध्ये आपल्या गावी परत आले. त्याकाळात उत्तर होडेशियातले लोकप्रतिनिधी असलेल्या स्टुवर्ट ब्राऊन यांचे द्विभाषी आणि सल्लागार म्हणून काही काळ त्यांनी काम केलं. त्यानंतर 1950 च्या दशकात आफ्रिकन नॅशनल काँग्रेस या पक्षाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. या पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली. पुढे ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. तिथं ब्रिटिश सत्तेविरुद्ध सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. या चळवळीवर महात्मा गांधीजींच्या भारतातल्या लढ्याचा प्रभाव होता. केनेथ या चळवळीचे नेते बनले. या संघर्षामुळे जवळपास 9 महिने त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं.

8 जानेवारी 1960 ला त्यांची तुरुंगातून सुटका झाली. बाहेर येताच त्यांनी तत्कालीन दक्षिण होडेशिया, उत्तर होडेशिया आणि न्यासलँड इथल्या ब्रिटिशांच्या वसाहतीक धोरणाविरुद्ध आवाज उठवायला सुरवात केली. त्यावरून आफ्रिकन नॅशनल काँग्रेसमध्ये मतभेद व्हायला सुरुवात झाली. तिथून वेगळं होऊन युनायटेड नॅशनल इंडिपेंडंट पक्षात ते सहभागी झाले. त्याचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आलं. याआधीच्या त्यांच्या तुरुंगवासामुळे त्यांना नायक म्हणून बघितलं जाऊ लागलं होतं. त्याचाच भाग म्हणून झांबियाच्या स्वातंत्र्य चळवळीला लोकांचा पाठिंबा वाढत गेला. ऑक्टोबर 1962 मध्ये झालेल्या निवडणुकीत केनेथ यांच्या नेतृत्वात पक्षाला यश मिळालं. संघर्षानंतर 1964 मध्ये उत्तर होडेशिया ब्रिटिश राजवटीतून मुक्‍त झाला. त्याचं नाव झांबिया असं ठेवण्यात आलं. केनेथ कौंडा या देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अंतर्गत संघर्षही होत राहिले. 1968 च्या निवडणुकांदरम्यान राजकीय हिंसाचार झाला. पण केनेथ पुन्हा सत्तेत आले. 1972 ला झांबियाला एकपक्षीय लोकशाही देश म्हणून घोषित करण्यात आलं. 1973 ला देशात नवं संविधान अस्तित्वात आलं. झांबिया तांब्याच्या बाबतीत जगातला तिसरा मोठा उत्पादक देश होता. पुढे

लोककल्याणकारी धोरणांसाठी या खाणींचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे उद्योगधंदे सुरू झाले. केनेथ यांनी ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये प्राथमिक शाळा काढल्या. 1960 पर्यंत तिथं माध्यमिक शाळांमध्ये 2500 आफ्रिकन विद्यार्थी होते; 1970 ला हीच संख्या 54 हजारावर पोचली. युनिव्हर्सिटी आणि मेडिकल कॉलेज उघडण्यात आली. सरकारी सेवा, सैन्य यामध्ये ते विद्यार्थी वरच्या पदांपर्यंत पोचले.

तांब्यांच्या खाणींमुळे कामगारांचा पगार वाढू लागला. त्याचवेळी देशाच्या आरोग्यव्यस्थेकडेही त्यांनी विशेष लक्ष दिलं. हे सगळं करत असताना दक्षिण होडेशिया म्हणजेच आताचा झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेतल्या इतर देशांच्या स्वातंत्र्यासाठीही कौंडा यांनी मोलाची भूमिका बजावली. दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या तुरुंगातल्या सुटकेसाठी त्यांनी प्रयत्न केले. 27 वर्षांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात त्यांचं काम केवळ झांबियापुरतं मर्यादित राहिलं नाही.

लोककल्याणकारी धोरणांसाठी म्हणून तिथल्या तांब्याच्या खाणींचं राष्ट्रीयीकरण झालं खरं; पण हा मुद्दा केनेथ यांच्यासाठी अडचणीचा ठरू लागला. त्याचवेळी दक्षिण होडेशिया, दक्षिण आफ्रिकेतल्या श्‍वेतवर्णीय सरकारशी संघर्ष होत राहिला. त्याचे पडसाद उमटत राहिले. 1980 च्या शेवटी त्यांचं सरकार अस्थिर करायचे प्रयत्न झाले. तांब्याचे भाव कोसळले आणि दुसरीकडे सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला सुरुवात झाली. अर्थव्यवस्था ढासळत गेली. तेलाच्या किमती वाढल्या. इतर देशांची मदत, गुंतवणूक कमी झाली. झांबियासाठी केवळ एकपक्षीय व्यवस्थाच हिताची आहे असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षाला संपवलं. तसे आरोप झाले. त्यामुळे केनेथ यांच्या प्रतिमेला तडा जाऊ लागला.

सरकारविरोधातला असंतोष असाच वाढत राहिला. 1990 ला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये राजधानी लुसाकात दंगली उसळल्या. यात 20 लोक मारले गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकार आणि पर्यायाने राष्ट्राध्यक्ष असलेल्या केनेथ कौंडा यांना रोषाला सामोरं जावं लागलं.

बहुपक्षीय लोकशाहीची मागणी होऊ लागली. त्यामुळे त्यांना 31 ऑक्टोबर 1991 ला निवडणुकीची घोषणा करावी लागली. त्यात कौंडा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. शेवटी 2 नोव्हेंबर 1991 'मूव्हमेंट फॉर मल्टीपार्टी डेमोक्रॉसी'च्या फ्रेडरिक चिलुबा यांच्याकडे झांबियाची सूत्र आली. या घटनेनं देशात बहुपक्षीय निवडणुकांची मुहूर्तमेढ रोवली गेली.

निवडणुकीत हरल्यावरही केनेथ कौंडा यांचा राष्ट्राध्यक्ष चिलुबा आणि त्यांच्या पक्षाशी संघर्ष होत राहिला. 1996 मध्ये त्यांनी चिलुबा यांच्याविरोधात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवायची योजना आखली. त्यामुळे सरकार आक्रमक झालं. पुढे झांबियाच्या संविधानात बदल करत कौंडा यांना निवडणुकीपासून रोखलं गेलं. 25 डिसेंबर 1997 ला त्यांना याच कारणासाठी अटकही झाली. सरकारने त्यांना काही दिवस तुरुंगात ठेवलं. सुटकाही झाली. पण पुढे जून 1998 पर्यंत त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. पण काम सुरूच राहिलं.

एडस्शी संबंधित आजारानं त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. त्याआधी त्यांच्या मुलाचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला. ही गोष्ट त्यांनी लपवली नाही तर स्वीकारली. त्यातून एचआयव्ही आणि एडस्विरोधातली लढाई सुरू झाली. त्यासाठी त्यांनी 'कौंडा चिल्ड्रन ऑफ आफ्रिका फाऊंडेशन' नावाची संस्था काढली. त्याचं चेअरमनपद त्यांच्याकडे आलं.

कौंडा यांनी ब्लॅक गव्हर्न्मेंट, झांबिया शॅल बी फ्री, ह्यूमॅनिझम इन झांबिया अँड इटस् इंप्लिमेंटेशन ही पुस्तकं लिहिली. भारत सरकारकडून त्यांना 1975 मध्ये जवाहरलाल नेहरू पुरस्कार देण्यात आला होता. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधींनी 'आफ्रिकी स्वातंत्र्य आणि एकात्मता यांचा खंदा पुरस्कर्ता' अशा शब्दांत त्यांचा गौरव केला होता. 2012मध्येही ते भारताच्या दौर्‍यावर आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT