राजीव मुळ्ये
काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, दरवर्षी सुमारे पाच लाख भूकंप होतात, म्हणजेच जवळजवळ प्रत्येक मिनिटाला एक भूकंप होतो! या पाच लाख भूकंपांपैकी सुमारे एक लाख भूकंप असे असतात, जे पृथ्वीच्या विविध भागांमध्ये लोकांना जाणवतात. त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, यापैकी बहुतांश भूकंप हानीविरहित असतात. परंतु, मोठ्या भूकंपाचा हादरा बसलाच तर कमीत कमी नुकसान व्हावे, अशी उपाययोजना आपण करू शकतो.
तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपाने जगाला पुन्हा एकदा निसर्गाच्या रौद्रावताराचे दर्शन घडले आहे. 7.8 रिश्टर स्केल इतक्या भीषण तीव्रतेच्या या भूकंपाने सुंदर अशा तुर्कस्थानची अक्षरशः वाताहात केली. रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या तुफान बॉम्ब वर्षावानंतर तेथील जुन्या-नव्या वास्तू ज्या पद्धतीने छिन्नविच्छिन्न झालेल्या दिसल्या, त्याहून भीषण स्थिती आज तुर्कस्तानात दिसून येत आहे. बोलीभाषेत म्हणताना आपण सहजगत्या पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे इमारती कोसळल्या असे म्हणून जातो; परंतु ज्यांच्या डोक्यावरचे छप्पर, स्वप्नांतील घर उद्ध्वस्त होते आणि या काँक्रीटच्या ढिगार्याखाली आप्तस्वकीय, नातलग, मित्र अडकून मरण पावतात तेव्हा त्यांच्या वेदनांची तीव्रता खूप भयंकर असते. सोमवारी 6 फेब—ुवारी रोजी इजिप्त, लेबनान, इस्रायल, सायप्रससह अनेक पश्चिम आशियाई देशांमध्ये या भूकंपाचे हादरे जाणवले. या भूकंपाने 24 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाच्या कटू स्मृती जाग्या झाल्या. 1999 मध्ये तुर्कस्तानात 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता आणि त्यामध्ये तब्बल 17 हजार जणांचा मृत्यू झाला होता. यंदाच्या भूकंपाची तीव—ता त्याहून अधिक होती. अभ्यासकांच्या मते, या भागात जाणवलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप आहे. आजघडीला तेथील मृतांची आकडेवारी तुलनेने कमी दिसत असली, तरी प्रत्यक्षात हा आकडा बराच मोठा असू शकतो. तुर्कस्तानात आणि सीरियामध्ये बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. प्रतिकूल हवामानामुळे यामध्ये अनेक अडचणी येताहेत.
तुर्कीचे राष्ट्रपती एर्डेगॉन यांनी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच भूकंपाने प्रभावित भागांमध्ये तीन महिन्यांची आणीबाणी जाहीर केली आहे. सीरिया हा देश तर आधीच गृहकलहामुळे बेचिराख झालेला होता. तशातच आता या नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला आहे. तुर्कीचा विचार करता महागाई आणि स्थलांतरितांच्या समस्यांचा सामना करणार्या एर्डेगॉन सरकारसाठी या भूकंपामुळे आव्हानांचा डोंगर उभा केला आहे. येत्या मे महिन्यामध्ये तेथे सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. भारतासह जवळपास 45 हून अधिक देशांनी या भागातील भूकंप पीडितांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, आभाळच फाटलंय, ठिगळं तरी कुठं लावायची, अशी इथली स्थिती आहे. भारताने विशेष विमानांनी मदत आणि बचावासाठीच्या टीमसोबत डॉक्टरांची तुकडीही पाठवली आहे आणि त्यांनी येथील बचावकार्यास सुरुवातही केली आहे.
तुर्कस्तानाची गणना जगातील सर्वाधिक धोकादायक भूकंपप्रवण क्षेत्रामध्ये होते. 1939 आणि 1999 मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपांनंतरही या देशाने कोणताही बोध घेतलेला नाही. आजही तेथे कमकुवत इमारतींची उभारणी सुरूच असते. आताच्या भूकंपातही तेथील भक्कम पायावर उभ्या असलेल्या आणि बांधकामाचा दर्जा व गुणवत्ता चांगल्या असणार्या अनेक इमारती शाबीत राहिल्या आहेत. ही बाब खरे तर आश्चर्यकारकच म्हणायला हवी. कारण, 7.8 रिश्टर स्केल ही तीव्रता भूकंपाबाबत खूप भीषण मानली जाते. भलीभली जुनी आणि भक्कम बांधकामे या तीव्रतेचा मुकाबला करण्यास अक्षम ठरतात आणि उखडून पडतात.
महाराष्ट्रात 1993 मध्ये लातूर-किल्लारी भागात झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल होती; परंतु काही सेकंदांत होत्याचे नव्हते झाले होते. 52 खेडेगावांमधील जवळपास 30 हजारांहून अधिक घरे आणि आधारभूत सोयीसुविधा या भूकंपाने कायमच्या नष्ट केल्या होत्या. आजही भारताचा जवळपास 60 टक्के भूभाग हा भूकंपाच्या द़ृष्टीने अतिसंवेदनशील किंवा अतिधोकादायक या श्रेणीमध्ये गणला जातो. यानुसार देशातील 304 दशलक्ष कुटुंबांपैकी सुमारे 95 टक्के कुटुंबे वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांना बळी पडू शकतात. एका सर्वेक्षणानुसार, भारतात दरवर्षी 900 ते 1,000 भूकंपाचे धक्के जाणवतात.
1897 पासून ते 2005 या कालखंडात भारतात झालेल्या शक्तिशाली भूकंपांचा आढावा घेतल्यास 26 डिसेंबर 2004 मध्ये भारत आणि श्रीलंकेत झालेल्या भूकंपाची तीव्रता सर्वाधिक म्हणजे जवळपास 9.00 ते 9.3 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली होती. त्याखालोखाल 15 जानेवारी 1934 रोजी बिहारमध्ये 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. 15 ऑगस्ट 1950 रोजी अरुणाचल प्रदेशात जाणवलेल्या भूकंपाची तीव्रता 8.5 इतकी होती. तुर्कस्तानशी तुलनाच करायची झाल्यास 2005 मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या भूकंपाशी करता येईल. 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपाने तब्बल 80 हजार जणांचा बळी घेतला होता.
तुर्कस्तानात गेल्या अडीच दशकांमध्ये विनाशकारी भूकंपांनी 18 हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. भूकंप कसा होतो, याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे; परंतु तो कधी होईल, याबाबत अद्याप कोणतेही भाकीत करणे शक्य होऊ शकलेले नाही. जमीन का हादरते, हे समजून घेण्यासाठी सर्वात आधी आपल्याला पृथ्वीची संरचना समजून घ्यावी लागेल. वस्तुतः, संपूर्ण जग 12 टेक्टॉनिक प्लेटस्वर (प्रस्तर) उभे आहे आणि त्या प्रस्तरांखाली लाव्हा रस आहे. हे सर्व प्रस्तर लाव्हा रसावर तरंगत असतात. हे प्रस्तर एकमेकांना भिडल्यामुळे भूकंप होतो. आपली पृथ्वी मुख्यत्वे चार स्तरांनी बनली आहे. त्यात इनर कोअर, आऊटर कोअर, मँटल आणि क्रस्ट या स्तरांचा समावेश होतो. क्रस्ट आणि त्यावरील मँटल यांना लिथोस्फेअर म्हटले जाते. हे 50 किलोमीटर जाडीचे मोठे स्तर असतात. त्यालाच टेक्टॉनिक प्लेटस् म्हटले जाते. या टेक्टॉनिक प्लेटस् आपापल्या जागी हलत असतात, फिरत असतात, घसरत असतात. या प्लेटस् दरवर्षी आपल्या स्थानावरून अंदाजे 4 ते 5 किलोमीटर एवढे अंतर सरकत असतात.
या प्रक्रियेत कधी एक प्लेट दुसर्या प्लेटपासून दूर जाते, तर कधी एक प्लेट दुसर्या प्लेटच्या जवळ येते. तसेच या प्रक्रियेत या प्लेटस् एकमेकांना कधी कधी धडकतात. त्यामुळेच भूकंप होतो आणि जमीन हादरते. या प्लेटस् जमिनीच्या पृष्ठभागापासून 30 ते 50 किलोमीटर खोलीवर आहेत. प्लेटस्च्या हालचालींमुळे पृथ्वीच्या पोटात ज्या ठिकाणी ऊर्जा उत्पन्न होते, त्याच ठिकाणी भूकंपाचा केंद्रबिंदू असतो. त्या स्थानावर भूकंपाची कंपने अधिक प्रमाणात जाणवतात. कंपनांच्या लहरी जसजशा दूर दूर जातात, तसतसा त्यांचा प्रभाव कमी कमी होत जातो. तुर्कस्तान आणि त्याच्या भवतालचा भूभाग हा अॅनाटोलियन प्लेटस्वर विसावलेला आहे. सहा टेक्टॉनिक प्लेटस्नी हा देश वेढलेला आहे. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते, जमिनीच्या पोटात असलेल्या या प्लेटस् एकमेकांशी भिडल्यामुळे भूकंप होतो.
या कंपनामुळे जमीन आपोआप हलण्याची प्रक्रिया काही काळ सुरू राहते. रिश्टर स्केलवर एखाद्या भूकंपाची तीव्रता 7 किंवा त्याहून अधिक नोंदविली गेली; तर सुमारे चाळीस किलोमीटरच्या पट्ट्यात भूकंपाचे धक्के तीव्र असतात. परंतु, भूकंपाची कंपने वरील दिशेने आहेत की, त्याच परिसरापुरती मर्यादित आहेत, यावर ही तीव्रता अवलंबून असते. भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात जितका खोलवर असेल, तितकी त्याची तीव्रता कमी प्रमाणात जाणवते. 8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे 60 लाख टन स्फोटकांपासून निघू शकेल एवढी ऊर्जा निर्माण होते. रिश्टर स्केलवर 5 पेक्षा कमी तीव्रतेचा भूकंप कमी क्षमतेचा मानला जातो. वर्षाकाठी असे सुमारे 600 भूकंप होतात; मात्र ते फारसे नुकसानकारक नसतात. परंतु, तरीही नुकसानीचे प्रमाण त्या त्या पृष्ठभागाच्या संरचनेवर अवलंबून असते.
काही भूगर्भशास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार, दरवर्षी सुमारे पाच लाख भूकंप होतात, म्हणजेच जवळजवळ प्रत्येक मिनिटाला एक भूकंप होतो! या पाच लाख भूकंपांपैकी सुमारे एक लाख भूकंप असे असतात, जे पृथ्वीच्या विविध भागांमध्ये लोकांना जाणवतात. त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, यापैकी बहुतांश भूकंप हानीविरहित असतात. परंतु, मोठ्या भूकंपाचा हादरा बसलाच, तर कमीत कमी नुकसान व्हावे, अशी तरतूद आपण करू शकतो. याबाबतीत जपानसारख्या देशाकडून आपण खूप काही शिकू शकतो. तिथे एखाद्या नको असलेल्या पाहुण्यासारखा भूकंप केव्हाही येऊन थडकतो; पण हे लक्षात घेऊन तेथे भूकंपरोधक घरांची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे जीवितहानी कमी करण्यात जपानला यश आले. अशाप्रकारचे प्रयत्न तुर्कस्तानसारख्या अतिसंवेदनशील भागांमध्ये होणे आवश्यक आहे.
यानिमित्ताने पुन्हा भारताचा विचार केल्यास भूकंपाच्या धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन भारताची विभागणी चार झोनमध्ये करण्यात आली आहे. झोन-2 मध्ये दक्षिण भारतातील राज्यांचा समावेश होतो. तेथे भूकंपाचा धोका सर्वात कमी आहे. झोन-3 मध्ये मध्य भारताचा समावेश होतो. झोन-4 मध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील क्षेत्रांना समाविष्ट करण्यात आले आहे. झोन-5 मध्ये हिमालयाचे क्षेत्र आणि ईशान्येकडील राज्यांसह कच्छचा समावेश करण्यात आला आहे.
झोन-5 मध्ये भूकंपाचा धोका सर्वाधिक असल्याचे मानले गेले आहे. वास्तविक, इंडियन प्लेट हिमालयापासून अंटार्क्टिकपर्यंत पसरलेली आहे. ही प्लेट हिमालयाच्या दक्षिणेला आहे, तर युरेशियन प्लेट हिमालयाच्या उत्तरेला आहे. त्यात चीन आदी देशांचा समावेश होतो. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, इंडियन प्लेट आग्नेयेच्या दिशेला युरेशियन प्लेटकडे सरकत आहे. जर या दोन प्लेटस् एकमेकांना धडकल्या, तर भूकंपाचा केंद्रबिंदू भारतात असेल. परंतु, अचानक भूकंपाचा धक्का जाणवल्यास आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. याबाबत प्रबोधनाची गरज मोठी असून, तुर्कस्तानच्या आपत्तीतून जगानेच याबाबत धडा घेतला पाहिजे.