तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर तालुक्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत लवकरच शिवसैनिकांचा मेळावा घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्रामध्ये सरकार कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील शिवसैनिकांची बैठक घेतली. तुळजापूर तालुक्यात संपर्क कार्यालय चालू करून शिवसेनेची बांधणी भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
तुळजापूर येथे शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्यामल वडणे, माजी उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, जि. प. सदस्य सोमनाथ गुड्ड, शहरप्रमुख सुधीर परमेश्वर नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, माजी जि.प. सदस्य राज अहमद पठाण आदी उपस्थित होते.
खासदार निंबाळकर यांनी धाराशिव जिल्ह्यात केवळ उद्धव ठाकरे यांना मानणारी शिवसेना आहे. यापुढील काळात बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचाराने सर्व तालुक्यात शिवसेना भक्कमपणे काम करणार आहे. जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्यात लवकरच शिवसेनेचे संपर्क कार्यालय सुरू केले जाईल, असे सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऐतिहासिक उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर धाराशिव म्हणून केले, रेंगाळत पडलेले वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले, 7 टीएमसी पाण्याचा प्रश्न सोडवला. यापुढील काळात शिवसेना अधिक आक्रमकपणे जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणार आहे. असे महिला आघाडीप्रमुख श्यामल पवार यांनी सांगितलेे.