उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
Latest

…आता ‘शिल्लक सेना’ उरली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Arun Patil

मुंबई/अकोला, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरेंचे भाषण लिहून देणारेसुद्धा आता त्यांच्या गटात उरलेले दिसत नाहीत. ही आता 'शिल्लक सेना' उरली आहे. त्यामुळे उधारीवर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून 'स्क्रिप्ट रायटर' आणलेला दिसतो; पण उद्धवजी, तुम्हाला कुठे-कुठे आणि कशी-कशी आग होतेय, हे आम्हाला ठाऊक आहे, असे सडेतोड प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिले. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अकोल्यात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. उद्धव ठाकरेंना जेव्हा कोणत्या नेत्याची भीती वाटते, तेव्हा ते सांगतात, त्या नेत्याचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे. याच्यापलीकडे त्यांची गाडी सरकत नाही; पण एक सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाचा बाप तोडू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.

2019 मध्ये उद्धव ठाकरे भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून खुर्चीच्या मोहाने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले, तेव्हाच सांगितले होते, 'मेरा पानी उतरता देख, किनारे पर घर मत बसा लेना, मै समुंदर हूँ, लौटकर जरूर आऊँगा.' मी तर आलो; पण येताना शिंदेंनाही घेऊन आलो, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते, ज्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा मी माझे दुकान बंद करीन; पण उद्धव ठाकरेंनी त्यांचे विचार बासनात गुंडाळून ठेवले. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल, काय काय बरळले. मला त्यांना विचारावे वाटते, कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू? अशा शब्दांत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

370 कलमच्या माध्यमातून ज्या पक्षाने काश्मीर भारतापासून तोडण्याचा डाव आखला होता, ते कलम रद्द करून त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करणार्‍याचे नाव आहे मोदी. औरंगजेबाने जे मंदिर आक्रमित केले, त्या काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण करणारे मोदी आहेत. अयोध्येत राम मंदिराचा मार्ग प्रशस्त करणारे नरेंद्र मोदी आहेत. प्राण गेले तरी बेहत्तर; पण काश्मीर भारतापासून तुटू देणार नाही, हे छातीठोकपणे सांगणारे आहेत अमित शहा. घरात बसून जे राजकारण करतात, त्यांना मोदी, शहा काय कळणार, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आता पुन्हा 23 तारखेला पाटण्यात नेते एकत्र येणार आहेत. हातात हात घालणार आहेत, हात वर करून एक फोटो काढणार आहेत. त्यात एक चेहरा यावेळी नवीन असेल. 2019 मध्येसुद्धा असाच एक फोटो काढला होता. त्या फोटोत एकूण 52 नेते होते आणि काँग्रेसचे 48 खासदार निवडून आले होते. कितीही वेली एकत्र आल्या, तरी वटवृक्ष एकच असतो. उद्धव ठाकरे अडीच वर्षांत केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले, त्यामुळे आमचे नुकसान झाले. उद्धव यांची राजकीय समज कमी, म्हणून त्यांचे आमदार सोडून गेले, हे मी नाही शरद पवारांनी सांगितले आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT