ज्याप्रमाणे बँकेत न जाता एटीएमवरून ग्राहकांना पैसे मिळतात. त्याच धर्तीवर रुग्णांना लवकरच एटीएमवर औषधे मिळणार आहेत. देशातील प्रत्येक ब्लॉक (विभाग) मध्ये औषधांचा पुरवठा करणारे हे मशिन बसवण्यात येणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना 24 तास औषधे उपलब्ध होणार आहेत.
देशातील एकूण सहा हजार ब्लॉकमध्ये अशा औषधांचे एटीएम मशिन बसवण्यात येणार आहे. रुग्णाला डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन मशिनमध्ये टाकल्यानंतर ही औषधे उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आंध— प्रदेशातील 'एटीएमझेड' या संस्थेमध्ये अशाप्रकारचा करार झाला आहे.
केंद्र सरकारकडून आधीपासूनच ब्लॉकस्तरावर अयूर संजीवनी केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांवर आता ही औषधांची एटीएम बसवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, कोरोना चाचणी, गर्भवती महिलांना द्यावयाची औषधे यासह ऑपरेशनसाठीआवश्यक वैद्यकीय उपकरणे या एटीएममधून मिळणार आहेत. कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकांना ऑक्टोबर महिन्यापासून यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जेनेरिक औषधांवर भर
विशेष म्हणजे, ब्लॉकस्तरावर बसवण्यात येणार्या या औषधांच्या एटीएममधून शक्यतो जेनेरिक औषधे ठेवण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. या एटीएमना ई-कॉमर्स कंपन्यांकडून औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. अशाप्रकारची व्यवस्था ही ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना डोळ्यासमोर ठेवून सुरू केली जाणार आहे. कंपनीनिहाय औषधांचा साठा या एटीएममध्ये ठेवला जाईल.