कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शाहू मिलच्या जाग्यावर राजर्षी शाहू छत्रपतींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचा मार्ग दहा वर्षांनंतर मोकळा झाला आहे. वस्त्रोद्योग विभागाने जागा हस्तांतरित करण्याबाबतचा अहवाल उच्चाधिकार समितीला देण्याचा निर्णय गुरुवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या जागा हस्तांतरणाचा मोबदला शासनाकडून देण्याची कार्यवाही सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले.
पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात गुरुवारी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाहू स्मारकाबाबत बैठक झाली. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर उपस्थित होते.
शाहू मिलच्या जाग्यावर लोकराजा राजर्षी शाहूंचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात दि. 18 डिसेंबर 2012 रोजी केली होती. या स्मारकाचा 169 कोटींचा आराखडा महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आला होता. त्यावर जानेवारी 2014 मध्ये एक कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. त्यानंतर जून 2014 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साडेतीन कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली होती.
शाहू मिलच्या 27 एकर जागेत उभारल्या जाणार्या या स्मारकाचा राजर्षी शाहूंच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र होईल, या दृष्टीने आराखडा तयार करण्यात आला आहे.
गेल्या 10 वर्षांपासून केवळ जागेअभावी या स्मारकांचा प्रश्न रेंगाळला होता. आता जागा हस्तांतरणाचा अडसर दूर झाला. जागेपोटी वस्त्रोद्योग विभागाला शासन मोबदला देणार आहे. शाहू स्मारकाबाबत जिल्हास्तरावर समिती स्थापन केली जाईल. त्यासाठी पुढील आठवड्यात कोल्हापुरात होणार्या बैठकीत सादरीकरण केले जाणार आहे. यावेळी जि. प. अध्यक्ष राहुल पाटील यांच्यासह अधिकारी तसेच कोल्हापुरातून दूरदृश्य प्रणालीवरून जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर सहभागी झाले.
* जागेचा मोबदला देण्याची कार्यवाही
* जिल्हास्तरावर समिती स्थापन करणार
* पुढील आठवड्यात कोल्हापुरात बैठक