Latest

आ. महेश शिंदे यांचे विधानभवनाच्या दारातच उपोषण

Arun Patil

कोरेगाव ; पुढारी वृत्तसेवा : महावितरण कंपनीच्या अभियंत्यांकडून शेतकर्‍यांना सातत्याने अन्यायकारक वागणूक दिली जात असल्याच्या निषेधार्थ शेतकरी हितासाठी आ. महेश शिंदे यांनी गुरुवारी विधानभवनाच्या पायर्‍यांवर लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात खळबळ उडाली. वीज जोडणीवरून आमदार आक्रमक झाल्याने अखेरीस राज्य सरकारने तातडीने शेतकर्‍यांची वीज तोडणी बंद करणार असून, टप्प्याटप्प्याने वीज बिले भरून घेतली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आमदारांच्या उपस्थितीत ऊर्जा मंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी सरबत दिल्यानंतर आ. महेश शिंदे यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान, मुंबईतील लाक्षणिक उपोषणाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पडसाद उमटले असून मतदारसंघातील शेतकर्‍यांसह प्रमुख पदाधिकार्‍यांनी तहसिलदारांना निवेदन सादर केले.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महावितरण कंपनीच्या कामकाजामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. सदोष मीटरमुळे भरमसाठ बिले आकारली जात असून, अन्यायकारकरित्या वीज तोडणी केली जात आहे. ती त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी सकाळी विधानभवनाच्या प्रवेशद्वाराच्या पायर्‍यांवर आ. महेश शिंदे यांनी लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली. कृषी मंत्री ना. दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासह विविध पक्षातील आमदारांनी आ. महेश शिंदे यांच्या उपोषणास पाठिंबा दिला. विधानसभेसह विधान परिषदेत या विषयावर जोरदार गदारोळ झाला.

अखेरीस सरकारने तातडीने शेतकर्‍यांची वीज तोडणी बंद करणार असून, टप्प्याटप्प्याने वीज बिले भरुन घेतली जाईल, असे स्पष्ट केले. त्यानंतर नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड, महसूल राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्यासह आमदारांच्या उपस्थितीत ऊर्जा मंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी सरबत दिल्यानंतर आ. महेश शिंदे यांनी उपोषण मागे घेतले.

आ. महेश शिंदे यांनी आंदोलना-मागील भूमिका विषद करताना सांगितले की, कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महावितरण कंपनीचे अभियंते शेतकर्‍यांवर अन्याय करण्याची भूमिका घेत आहेत. शेतकर्‍यांच्या भावना लोकप्रतिनिधी या नात्याने शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेतला.

आ. महेश शिंदे यांनी ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या व्यथांना वाचा फोडण्याचे काम केले असल्याने कोरेगावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, बबनराव कांबळे, संतोषआबा जाधव, प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, प्रगतशील शेतकरी हणमंतराव जगदाळे, विजय पोपटराव जगदाळे, संजय काटकर, धनवान कदम, जवानसिंग घोरपडे, राजेंद्र दिसले, सुनीलदादा बर्गे, राहूल रघुनाथ बर्गे, महेश बर्गे यांच्यासह शेतकर्‍यांनी निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे यांना निवेदन सादर केले.

यावेळी अमोल माने, सुधीर जगदाळे, सोमनाथ जगदाळे, राजेंद्र मतकर, वैभव नडे, प्रदीप जगदाळे, संभाजी चव्हाण, राजेंद्र वैराट, संतोष कदम, प्रशांत संकपाळ, मंगेश बर्गे, संतोष बर्गे, अनिल पवार, हणमंत भोसले उपस्थित होते.

…तर पुन्हा 15 दिवसांनी आमरण उपोषणाचा निर्धार

महावितरण कंपनीने शेतकर्‍यांविषयी असुया मनात ठेवून, अन्यायकारक कारवाई सुरूच ठेवल्यास शेतकरीवर्ग आता शांत बसणार नाही. मुंबईच्या विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आ. शिंदे यांनी लाक्षणिक उपोषण करून सरकारसमोर भूमिका मांडली आहे. या आंदोलनाने महावितरण कंपनीला जाग न आल्यास येत्या 15 दिवसांत आमरण उपोषण करण्याचा निर्धार असल्याचे कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्यातील शेतकर्‍यांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT