Latest

अ‍ॅशेस मालिका : सामना वाचवण्याची इंग्लंडची धडपड

Arun Patil

अ‍ॅडलेड ; वृत्तसंस्था : सामना वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढण्याचा प्रयत्न करणार्‍या कर्णधार ज्यो रूटची विकेट शेवटच्या षटकांत पडल्यामुळे इंग्लंडचा पराभव आता जवळपास निश्चित झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या अ‍ॅशेस कसोटीच्या (Ashes series) चौथ्या दिवसाचा खेळ थांबण्यापूर्वी शेवटच्या षटकात मिशेल स्टार्कच्या चेंडूने ज्यो रूटच्या बॅटची कड घेतली.

अ‍ॅलेक्स कॅरीने कोणतीही चूक न करता झेल टिपला आणि इंग्लंडला दिवसाअखेर मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 468 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या इंग्लंडची अवस्था 4 बाद 82 अशी झाली आहे.

अ‍ॅडलेडच्या मैदानात सुरू असलेल्या डे-नाईट कसोटीत आपला दुसरा डाव 9 बाद 230 वर जाहीर करून ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर 468 धावांचे आव्हान ठेवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. दुसर्‍या डावातील दुसर्‍या षटकांत हमीदच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. रिचर्डसन याने त्याला खातेही उघडू दिले नाही. डेव्हिड मलान आणि रॉरी बर्न्स जोडीने धीराने खेळत संघाला थोडा दिलासा दिला; पण मलानला बाद करीत रिचर्डसनने पुन्हा एकदा इंग्लंडला अडचणीत आणले.

मलानच्या रुपात त्याने संघाला आणखी एक यश मिळवून दिले. मलान-बर्न्स जोडीने दुसर्‍या विकेटस्साठी 48 धावांची खेळी केली. यात मलानने 52 चेंडूंत 20 धावा केल्या. ज्यो रूटसोबत 22 धावांची भागीदारी करून सलामीवीर बर्न्सनेही तंबूचा रस्ता धरला. त्याने 95 चेंडूंचा सामना करताना 34 धावा केल्या.

धावफलकावर 70 धावा असताना इंग्लंडचे तीन गडी तंबूत परतले होते. चौथ्या दिवसाअखेर ज्यो रूट आणि बेन स्टोक्स नाबाद परततील अशी आशा इंग्लंडच्या चाहत्यांना होती; पण स्टार्कने इंग्लंड संघाची आणि त्यांच्या चाहत्यांची निराशा केली. चौथ्या दिवसातील अखेरच्या षटकात त्याने ज्यो रूटला बाद केले. रूटने 67 चेंडूंत 24 धावांची खेळी केली. (Ashes series)

त्याच्या रुपात इंग्लंडला मोठा धक्का बसला असून, कसोटी सामना वाचवणे त्यांच्यासाठी आता मुश्कील झाले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी इंग्लंडने 4 गड्यांच्या मोबदल्यात 82 धावा केल्या होत्या. बेन स्टोक्स 3 धावांवर नाबाद खेळत होता.

इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी अजूनही 386 धावांची आवश्यकता आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला मालिकेतील सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी केवळ अखेरच्या दिवशी 6 विकेटस् काढायच्या आहेत. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियानेच जिंकला होता. दुसरा सामना जिंकून मालिका विजयासाठी ते उत्सुक आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT