मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेपाठोपाठ आता महाराष्ट्रातील काँग्रेसमध्येही मोठी फूट पडण्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे या चर्चेतून समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण व भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाल्याची बातमी आल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात काँग्रेसचे दोन माजी मंत्री लवकरच शपथ घेतील. या दोघांपैकी एक जण याआधी राज्याच्या मुख्यमंत्रिपदावरही होता. दुसराही माजी मंत्री आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारादरम्यानच काँग्रेसचे आणखी काही आमदारही पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल होतील, असा या चर्चेचा एकूण सूर आहे. चर्चेचा रोख अशोक चव्हाणांकडे काँग्रेसचे नेते तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. भाजप समन्वयक आशिष कुलकर्णी यांच्या घरी हे दोन्ही नेते जवळपास अर्धा तास सोबत होते. दोन्ही नेत्यांत काय बोलणे झाले, ते अर्थातच गुलदस्त्यात आहे. काँग्रेसच्या संभाव्य दोन मंत्र्यांपैकी एक अशोक चव्हाण असतील, हे मात्र या भेटीतील गुलदस्त्यातून बाहेर आले आहे.
फडणवीस यांच्याशी भेट झाली, पण त्याला केवळ गणेशोत्सवाचे निमित्त होते. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
– अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेशाचा प्रस्ताव आला तर विचार करू, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना विखे-पाटील म्हणाले, चव्हाण यांचा निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. भाजप पक्षश्रेष्ठीच मग अंतिम निर्णय घेतील. काँग्रेस पक्षाला भविष्य राहिलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते आता आपला विचार करत आहेत. चव्हाण आणि आपली याबाबत चर्चा झालेली नाही, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :