मुंबई ; पुढारी डेस्क : महामुंबईसह अर्ध्या महाराष्ट्राने बुधवारी गारठलेल्या वातावरणाचा अनुभव घेतला. पहाटेचा काळोख सायंकाळपर्यंत कायम होता. त्याला कारण ठरला तो अवकाळी पाऊस आणि त्याच्या जोडीला बोचरे वारे. पहाटेपासूनच पावसाची संततधार लागली ती रात्री उशिरापर्यंत कायम होती. अशीच स्थिती 3 डिसेंबरपर्यंत राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, 17 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
बुधवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, कसारा, कर्जतसह, रायगड, पालघर पुणे, सातारा जिल्ह्यासह कोकणातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू झाला. मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप सुरू होती. पाऊस मुसळधार नसला तरीही सर्वत्र धुक्याची चादर आणि कमालीचा गारठा असे वातावरण होते. अनेक ठिकाणी धुक्यामुळे समोरचे काहीच दिसत नव्हते. मुंबईत लोकलमधून पाऊस आणि झोंबणार्या वार्यामुळे अनेकांनी स्वेटर घातल्याचे चित्र होते. चाकरमानी कामावर जाताना छत्री आणि स्वेटरसह घराबाहेर पडले होते.
धुळे, नंदुरबार, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांना पुढच्या 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोकणातल्या उर्वरित आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये म्हणजेच पुणे, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, जळगाव, बीड, आणि उस्मानाबाद या तब्बल 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
मच्छिमारांनाही येत्या 24 तासासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
तापमान घटले
राज्यभरात मंगळवारी दिवसभरात कमाल तापमानात घट झाल्याची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वाधिक 34.5 अंश सेल्सिअस तापमान रत्नागिरीत तर सर्वात कमी तापमान गोंदियात 12.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
वादळी वार्यांमुळे वाढला गारठा
वादळी वार्यांमुळे राज्यभरात कमालीचा गारठा जाणवत आहे. तर उत्तर महाराष्ट्रात वादळी वार्याचा वेग 44 ते 55 किलोमीटरवरून 65 किमीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दक्षिण – महाराष्ट्र गोवा किनार्यावर वादळी हवामानासह वार्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी प्रतितास पर्यंत वाढण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अवकाळी पावसाचा पिकांना फटका
अवकाळी पावसामुळे नाशिक, पुणे, सांगली, येथील द्राक्ष पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकणारे अंजीर, पुणे, सातारा, सांगली येथे होणार्या फुलशेतीला फटका बसेल. याशिवाय कांदा, टोमॅटो, बटाटा, मेथी, कोथींबीर या पिकांचेही नुकसान होणार आहे.
कोकणात भात पिकांना जबर फटका बसणार आहे. अवकाळी पावसामुळे कीड आणि रोगाचे प्रमाण वाढणार असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असल्याचे राज्याच्या कृषी हवामान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.रामचंद्र साबळे यांनी सांगितले.