Latest

अर्थवार्ता : निफ्टी व सेन्सेक्स

Arun Patil

* गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे 231.85 अंक व 884.57 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 16584.3 अंक व 55769.23 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये एकूण 1.42 टक्के तर सेन्सेक्समध्ये एकूण 1.61 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. 10 वर्षांच्या कालावधीच्या रोख्यांचा भाव शुक्रवारअखेर 3 बेसिस पॉईंटस्नी वाढून 7.46 टक्क्यांपर्यंत पोहोचला. गत सप्ताहात 10 वर्षं कालावधीच्या रोख्यांमध्ये (बेंचमार्क यील्ड) सुमारे एकूण 11 बेसिस पॉईंट्सची वाढ झाली. येत्या सप्ताहात रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक आहे. यामध्ये पुन्हा रेपो रेट वाढवला जाण्याची शक्यता बहुतांश अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. यामुळे रोख्यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तसेच रुपया चलन शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत 6 पैसे कमजोर होऊन 77.66 रुपये प्रती डॉलर स्तरावर बंद झाले.

* मे महिन्यात भारताचा सेवा क्षेत्राचा निर्देशांक (सर्व्हिस पीएमआय) मागील 11 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 58.9 पर्यंत पोहोचला. तसेच निर्मिती क्षेत्र निर्देशांक (मॅन्यूफॅक्चरिंग पीएमआय) 54.6 पर्यंत पोहोचला.

* भारताची व्यापारतूट मे महिन्यात तब्बल 23.33 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. निर्यातीत समाधानकारक 15.46 टक्क्यांची वाढ होऊन निर्यात 37.29 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. पेट्रोलियम आणि संबंधित उत्पादनांच्या आयातील सर्वाधिक म्हणजे 91.6 टक्के वाढ होऊन या वस्तूंची आयात 18.14 अब्ज डॉलर्सवर गेली. मे 2021 मध्ये देशाची व्यापारतूट केवळ 6.53 अब्ज डॉलर्स होती.

* टाटांच्या 'एअर इंडिया' अधिग्रहणात 'सिंगापूर कॉम्पीटिशन अँड कंझ्युमर कमिशन' या संस्थेच्या नियमांचा अडथळा. यापूर्वी टाटांचा 'विस्तारा' एअर लाईन्समध्ये 51 टक्के, तर सिंगापूर एअर लाईन्सचा 49 टक्के हिस्सा आहे. आता टाटांनी एअर इंडिया देखील खरेदी केली. त्यामुळे सिंगापूर-मुंबई, सिंगापूर-दिल्ली हवाई मार्गांवर काही ठरावीक कंपन्यांचे वर्चस्व प्रस्थापित होईल. सिंगापूर कॉम्पीटिशन अ‍ॅक्ट 2004 (सेक्शन 54) नुसार हे नियमबाह्य आहे. यामुळे टाटा समूह या अडथळ्यावर काय तोडगा काढतो का पाहावे लागेल.

* मे 2022 मध्ये सलग तिसर्‍या महिन्यात वस्तू आणि सेवा कराद्वारे (बीएसटी) केंद्र सरकारला 1 लाख 40 हजार कोटींपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. या महिन्यात 1,40,885 कोटींचे जीएसटी कर संकलन झाले. मागील वर्षीच्या मे महिन्याच्या जीएसटी कर संकलनाच्या तुलनेत यावर्षी तब्बल 44 टक्क्यांनी वाढ झाली.

* श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवरचे संकट अधिक गंभीर. श्रीलंकेच्या किरकोळ महागाई दरामध्ये (सीपीआय इन्फ्लेशन) तब्बल 39.1 टक्क्यांची वाढ. अन्नधान्याच्या महागाई दरात त्यापेक्षा अधिक म्हणजे 57.4 टक्क्यांपर्यंत वाढ. श्रीलंकेचा रुपया नुकताच डॉलरच्या तुलनेत 40 टक्के गडगडला होता. यावर्षी अर्थव्यवस्थेला दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी श्रीलंकेला 4 अब्ज डॉलर्सची गरज आहे. यासंदर्भात कर्ज मिळवण्याच्या द़ृष्टीने श्रीलंकेची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेसोबत (आयएमएफ) बोलणी चालू आहेत.

* देशातील सरकारी जीवन बीमा कंपनी 'एलआयसी'चे मार्च तिमाहीचे निकाल जाहीर. या तिमाहीत निव्वळ नफा मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 18 टक्के घटून 2372 कोटी झाला. एकूण आर्थिक वर्ष 2022 चा विचार करता, मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत नफा 39.4 टक्के वधारून 4043.12 कोटी झाला. एकूण प्रीमियमद्वारे जमा झालेली रक्कम 18.2 टक्के वधारून 1 लाख 43 हजार कोटी झाली. तसेच जीवन बीमा कंपन्यांच्या द़ृष्टीने महत्त्वाचा असलेल्या सोल्व्हन्सी रेशोमध्ये वाढ होऊन मागील वर्षी असलेला 1.76 सोल्व्हन्सी रेशो यावर्षी 1.85 झाला.

* देशातील महत्त्वाची स्टील उत्पादक कंपनी जेएसडब्ल्यू स्टील आपले उत्पादन वाढवण्यासाठी 20 हजार कोटींची गुंतवणूक करणार. सध्या असलेली 26 दशलक्ष टन प्रतिवर्ष स्टील उत्पादन क्षमता 10 दशलक्ष टनांनी वाढवून 36 दशलक्ष टन प्रतिवर्षपर्यंत वाढवणार. तसेच उत्पादन क्षमता आणखी वाढवण्यासाठी पुढील वर्षी आणखी 16 हजार कोटी गुंतवणुकीची कंपनीची योजना.

* देशातील महत्त्वाची सिमेंट उत्पादक कंपनी 'अल्ट्राटेक सिमेंट' आपली उत्पादन क्षमता 22.6 दशलक्ष टन प्रतिवर्ष वाढवण्यासाठी 12886 कोटी रुपये खर्च करणार. या उत्पादन वाढीपश्चात आदित्य बिर्ला उद्योग समूहाची सिमेंट उत्पादन क्षमता 159.25 दशलक्ष टन प्रतिवर्षपर्यंत जाईल.

* 27 मे रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची विदेशी चलन गंगाजळी (फॉरेक्स रिझर्व्ह) 3.85 अब्ज डॉलर्सनी वधारून 601.36 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT