आयकर रिटर्न भरण्यास आता काही दिवसांचाच कालावधी बाकी आहे. तुम्हीही तुमचा आयकर रिटर्न भरण्याची तयारी करत असाल. रिटर्न फाईल करण्याआधी तुम्ही सगळे आवश्यक कागदपत्रे एकत्र केली आहेत का ते पहा. तुमच्याकडून या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या.
आयकर रिटर्न फाईल करताना नाव, पत्ता आणि आधारकार्ड नंबर यासारखे तपशील अतिशय अचूकतेने लिहिणे आवश्यक असते. त्यात काही ना काही किरकोळ चूक राहते. म्हणूनच नाव, पत्ता, कराची रक्कम, बँक खाते नंबर आणि इतर तपशील सावधानतेने लिहा आणि दोनदा तपासून पहा. एखाद्या किरकोळ चुकीमुळे तुम्ही आयकर रिफंडला मुकू शकता. जर तुम्ही रिटर्न फाईल केल्यानंतर एखादी चूक झाल्याचे लक्षात आले, तर आयकर विभाग सुधारणा करण्याची संधी देतो.
आपल्या मिळकतीच्या स्रोतातून जो कुणी (म्हणजे मालक किंवा अन्य कुणी) कर कापून घेतो, त्याला आपला पॅन नंबर बरोबर द्या. जर तुमच्या मालकाच्या फॉर्ममध्ये (फॉर्म 16 ए) जर टॅन किंवा पॅनचा तपशील चुकीचा असेल तर तुम्हाला टीडीएस जमा होण्याचा लाभ मिळणार नाही. म्हणूनच फॉर्म 26 एएसची पडताळणी करा. त्यातून कर सरकारजमा झालेला आहे की नाही, हे समजते.
आयकर कायद्याच्या कलम 80 सी नुसार अनेक प्रकारच्या गुंतवणुकीवर कर सवलतीची तरतूद आहे. तुम्ही जर पीपीएफ, विमा, इएलएसएसमध्ये केलेल्या गेलेल्या गुंतवणुकीवर दीड लाख रुपयांपर्यंत च्या रकमेवर तुम्हाला करसवलते. म्हणूनच जे काही डिडक्शन्स आहेत त्यांची नोंद आयटीआरमध्ये करा. रिटर्न भरतानाच डिडक्शन्सचा तपशील दिला नाहीत तर नंतर ती स्वीकारली जात नाहीत.
सर्व स्रोतांद्वारे मिळत असलेले आर्थिक उत्पन्न जाहीर करा. त्यातील एखादे आयकरमुक्त असू शकते. लॉटरी किंवा घर विकण्यातून मिळालेल्या पैशाचीही नोंद करा. बर्याचदा मुदतठेव आणि रिकरिंग डिपॉझिट करमुक्त असल्याचा गैरसमज असतो.
आयकर रिटर्न ई-फाईल करताना रिटर्नवर तुम्हाला डिजिटल सही करायला सांगितले जाते. तुमची डिजिटल सही नसेल तर एक पर्याय असा असतो की तुम्ही आयटीआर 5 योग्य सही करून केंद्रीकृत प्रक्रिया केंद्रा (सीपीसी)कडे बंगळूर येथे पाठवून द्यावे. आयटीआर 5 रिटर्न फाईल केल्याच्या 120 दिवसांत पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने पाठवा. वरील मुदतीत तुम्ही आपल्या रिटर्नचा ऑनलाईन ई – पडताळणी करावी, हाही एक पर्याय आहे. असे केले नाही तर तुम्ही रिटर्न फाईल केलाच नाही, असे मानले जाईल. म्हणूनच आयटीआर 5ची पडताळणी न करण्याची चूक करू नका.
आयकर रिटर्न भरताना करयोग्य मिळकतीच्या जागी एकूण मिळकत भरण्याची चूक करदात्यांकडून नेहमी होते. फॉर्म 16 एमध्ये ही गडबड होते. करयोग्य मिळकत आणि एकूण मिळकत यातील गोंधळातून ही चूक होते. ही चूक टाळण्यासाठी 16 एच्या कॉलम 6 मध्ये नमूद केलेली मिळकतच लिहा.
– राधिका बिवलकर