Latest

अर्जेंटिनामध्ये होता महाकाय पक्षी

Arun Patil

ब्यूनस आयर्स : सुमारे 60 लाख वर्षांपूर्वी सध्याच्या अर्जेंटिनाच्या भूमीवर विशालकाय पक्षी वावरत होते. या पक्ष्यांचे वजन होते तब्बल 70 किलो आणि त्यांच्या पंखांचा फैलाव तब्बल 7 मीटरचा होता. या पक्ष्यांना 'अर्जेंटाविस मॅग्नीफिसेन्स' असे वैज्ञानिक नाव देण्यात आलेले आहे. या पक्ष्याचा आकार 'सेस्ना 152' या लाईट एअरक्राफ्टइतका होता. एखाद्या छोट्या विमानासारखा असलेला हा पक्षी खतरनाक शिकारी होता. त्याला आजपर्यंतचा सर्वात मोठ्या आकाराचा पक्षी मानले जाते.

अर्जेंटाविस शिकारी पक्ष्यांच्या एका विलुप्त समूहाचा सदस्य आहे ज्याला 'टेराटोर्न' म्हणजेच 'राक्षसी पक्षी' म्हटले जाऊ शकते. या पक्ष्यांचा संबंध सध्याच्या तुर्की गिधाड, कंडोर्स आणि सारस पक्ष्यांशीही आहे. मात्र, या अर्जेंटाविसच्या समोर सध्याचे कंडोर्सही खुजेच ठरू शकतात. त्यांचे वजन कंडोर्सपेक्षा सहापट अधिक होते आणि पंखांचा फैलाव दुप्पटीने अधिक होता. वजन अधिक असूनही ते सहजपणे उड्डाण करू शकत होते. अर्थातच त्यांची हाडे पोकळ व हलकी होती तसेच पंख अतिशय मजबूत होते.

सध्याच्या आधुनिक पक्ष्यांमध्येही हे गुण असतात. सध्याचा जगातील सर्वात वजनदार पक्षी म्हणून 'द ग्रेट कोरी बस्टर्ड' ला ओळखले जाते. या पक्ष्याचे वजनही अर्जेंटाविसच्या तुलनेत तिप्पटीने कमी आहे. कोरीचे वजन 19 किलोग्रॅम असते व ते आफ्रिकेत आढळतात. त्याच्या पंखांचा फैलाव दोन फुटांपेक्षा अधिक असतो.

उडणार्‍या वजनदार पक्ष्यांमध्ये दक्षिण अमेरिकेतील एंडियन गिधाडांचाही समावेश होतो. सध्या जगातील सर्वात मोठा पक्षी म्हणून शहामृगाची ओळख आहे. त्याचे वजन 150 किलो इतके असते. तसेच तो सुमारे तीन मीटर लांबीचा असतो व त्याच्या पंखांचा फैलाव दोन मीटरपर्यंत असतो. मात्र, शहामृग उड्डाण करू शकत नाहीत. कोट्यवधी वर्षांपूर्वी काही डायनासोरही उड्डाण करीत असत. मात्र, ते पक्ष्यांऐवजी सरिसृप कुळाशी संबंधित होते. त्यामुळे अर्जेंटाविस हाच जगातील आजपर्यंतचा सर्वात मोठा व उडू शकणारा पक्षी ठरतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT