Latest

अमित शहा-शरद पवारांच्या बैठकीत भाजपसोबत जाण्याचे ठरले होते : अजित पवार

Arun Patil

इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : 2019 ला विधानसभेची निवडणूक झाल्यावर देशातील एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी दिल्लीत मी, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अमित शहा, प्रफुल्ल पटेल आणि तो उद्योगपती, असे सहाजण बसायचो. चर्चा व्हायची. त्यामध्ये भाजपबरोबर जाण्याचे निश्चित झाले होते. 35 जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरले होते. पण 'त्यांनी' शब्द पाळला नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर घणाघाती आरोप केला.

येथे आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शनिवारी अजित पवार बोलत होते. मला त्यावेळी अमित शहा म्हणाले, चर्चा होते आणि शब्द पाळला जात नाही, तुम्हाला पाळावा लागेल. मुंबईत आल्यावर मात्र वेगळीच चर्चा सुरू झाली. त्यांना मी सांगितले की, मी शब्दाचा पक्का आहे. मला सांगा, कधी शपथ घ्यायची? मीडिया जो पहाटेचा शपथविधी म्हणते, ती शपथ सकाळी आठ वाजता घेतली होती. त्यावेळी गुप्त मतदान झाले असते तर आजची परिस्थिती वेगळी असती, असा दावाही अजित पवार यांनी केला.

अजित पवार म्हणाले की, 2019 ला विधानसभेची निवडणूक झाल्यावर देशातील एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी झालेल्या बैठकीवेळी कोणाचे किती मंत्री हे ठरले होते. मंत्री कोण, राज्यमंत्री कोण, हे नक्की झाले होते. 43 पैकी भाजपचे किती, आमचे किती, हे ठरले होते. एवढी सगळी चर्चा त्या वेळेला त्या उद्योगपतीच्या घरी त्यांच्या उपस्थितीत झाली होती. त्यावेळेला अमित शहा मला म्हणाले होते, अजित, चर्चा होते, नंतर शब्द पाळला जात नाही. तुम्ही या चर्चेत सहभागी आहात, त्यामुळे तुम्हाला नंतर शब्द पाळावा लागेल.

दिल्लीतील चर्चा संपवून आम्ही मुंबईत आलो आणि येथे मात्र वेगळी चर्चा सुरू झाली. मी त्यांना विचारले, असे कसे? आपले तर ठरले. येथे तर वेगळे चाललेय. त्या वेळेला मला उत्तर मिळाले, आता आपल्याला असे करावे लागेल. मी म्हटले, शब्द दिलेला आहे, तो पाळावा लागेल.

उद्योगपती याला साक्षी आहेत. मी शब्दाचा पक्का आहे. तुम्ही सांगितले तर मी शपथ घेतो. त्याप्रमाणे मी शपथ घेतली आणि पुढे तो शब्द पाळलाच गेला नाही आणि तो पहाटेचा शपथविधी नव्हता, सकाळी आठ वाजता शपथ घेतली होती, असेही अजित पवार यांनी सांगितले.

भाजपसोबत जाण्यासाठी कधीच संमती नव्हती : शरद पवार

दरम्यान, अजित पवार यांच्या आरोपाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपमध्ये जाण्यासाठी आमची कधीच संमती नव्हती आणि यापुढेही नसेल, अशा शब्दांत शरद पवार यांनी अजित पवार यांचा दावा खोडून काढला. शरद पवार अहमदनगर दौर्‍यावर होते. त्यावेळी अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीसंदर्भात केलेल्या दाव्यावरून शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी तो आरोप फेटाळून लावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT