Latest

अभी तो पार्टी शुरू हुई है..!

backup backup

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्याने जल, जमीन, जंगल, ध्वनी, वायू प्रदूषण रोखण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे गोव्यात येऊन सांगितले होते. गोव्याचे नाईट लाईफ आणि ध्वनी प्रदूषणाचे मेतकूट वर्षानुवर्षांचे आहे. ते तसेच राखले जाईल. नाईट लाईफचा चेहरा बदलाची शक्यता धूसरच.

तुम्ही गोव्यात कशासाठी येता? या प्रश्नाचे नेमके कोणते उत्तर तुमच्या मनात पटकन येते? उत्तरासाठीचे शब्द वेगवेगळे असतील. अर्थ एकच असतो – चैनी करायला. ज्याची त्याची चैनी, ज्याची त्याची व्याख्या, ज्याच्या त्याच्या पद्धती. या प्रश्नाच्या उत्तरात एक शब्द कायम झळकतो तो म्हणजे पार्टी. 'अभी तो पार्टी शुरू हुई है…' असे म्हणत गोव्यात आलेले बहुतेकजण बेधुंद झालेले असतात. नानाविध पर्यटनस्थळी, तसेच समुद्रकिनारी पार्ट्यांची धूम सुरू असते. या ठिकाणी, विशेषतः किनारपट्टीत वाद्यांचा दणदणाट उत्तररात्रीपर्यंत सुरू असतो. वर्षअखेरीस तर विचारायची सोयच नसते. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत पार्ट्या सुरू असतात, तरीही… 'अभी तो पार्टी शुरू हुई है…' असा सारा माहौल असतो.

पार्टीतील वाद्यांचा दणदणाट परिसरातील स्थानिक लोकांना मात्र विलक्षण व्यथित करत असतो. त्यामुळे त्यांनी प्रारंभी पंचायत, पोलिस ठाण्यात धाव घेतली. राजकारण्यांपुढे गार्‍हाणे गायले. खरे तर याच यंत्रणांच्या अभद्र युतीमुळे पाटर्यांना अभय मिळालेले असते. जबरदस्त अर्थकारण डावलून ते लोकांच्या तक्रारी थोड्याच ऐकणार आहेत? अखेर लोकांनी न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने याचिकेची दखल घेतली. सार्वजनिक खुल्या जागेत रात्री दहानंतर कोणत्याही स्थितीत ध्वनिक्षेपक बंदच केला पाहिजे, असे न्यायालयाने ठणकावले. झाले! आता गोव्याच्या नाईट लाईफचे काय होणार हो, असा प्रश्न पडला. न्यायालयाचा आदेश कागदावरच राहील, याची काळजी सर्व बिलंदर यंत्रणांनी घेतली. ध्वनी प्रदूषण मात्र नेहमीप्रमाणेच झाले. पार्टी वाजतच राहिली, नाईटलाईफ गाजतच राहिले. 'अभी तो पार्टी शुरू हुई है..!'

हा संदर्भ आणि पार्श्वभूमीचे नेपथ्य विषय विस्तारासाठी. झाले काय, तर ध्वनी प्रदूषणासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशावर विधानसभेत शून्य प्रहरात बुधवारी, 18 जानेवारीला चर्चा झाली. गोवा विधानसभेच्या अधिवेशनाचा हा तिसरा दिवस. काही आमदारांनी न्यायालयाच्या आदेशाचा विषय उपस्थित केला होता. या विषयावर पर्यावरण, कायदा आणि न्याय खात्याचे मंत्री निलेश काब्राल बोलले. ते सविस्तर बोलले. त्यामुळे सरकारची भूमिका समजली. न्यायालयाचा आदेशच असा होता की, आता करायचे तरी काय? असा प्रश्न मागील वर्षअखेरीस म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये सर्व संबधितांना पडला होता. यंत्रणांनी कागद रंगवले असतीलही, केले फारसे काहीच नाही. परिणाम काय झाला? तर अभी तो पार्टी शुरू हुई है… माहौल वाजतच राहिला, नाईट लाईफ गाजतच राहिले.

पर्यटन हा गोव्याचा आर्थिक कणा. बारा ते पंधरा वर्षापूर्वी महसुलाचा प्रमुख स्रोत होता तो खाण व्यवसाय. तप उलटून गेले. खाणी बंद कराव्या लागल्या. त्यामुळे मोठी आर्थिक भिस्त पर्यटन क्षेत्रावर. जागतिक पर्यटननगरी अशी गोव्याची प्रतिमा. गोवा म्हणजे बीचेस, बॉटल्स आणि बेबीज म्हणजेच थ्री बीज या समीकरणाचे वयोमानही मोठे आहे. तुम्हाला पटो – न पटो. गोवा म्हणजे ड्रग्ज डेस्टिनेशन, वेश्या व्यवसायाचे डेस्टिनेशन अशी गोव्याची जगभरची एक प्रतिमा. अभ्यासकच हे जाहीर सांगतात. इतकेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीही. त्यामुळे पार्ट्यांचा आवाज 10 वाजता बंद होण्याची शक्यता कमीच. याचे कारण… अभी तो पार्टी शुरू हुई है…

तर मुद्दा विधानसभेत सरकारने मांडलेल्या भूमिकेचा. मायबाप सरकार म्हणते, गोवा वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश. गोव्याच्या जत्रा, गोव्याचे फेस्त, नानाविध महोत्सव, विवाह सोहळे, खुल्या जागेतील नानाविध पारंपरिक सण-समारंभ ही आमची संस्कृती. अशा वेळी रात्री संगीत वाजणार. ते वाजतच राहण्यासाठी संबंधित कायद्यामध्ये दुरुस्तीची गरज आहे. त्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करेल. एंटरटेन्मेंट झोन करू, त्यांची संख्या वाढवू. तेथील गोंगाटावर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा निर्माण करू. मंत्र्याने वापरलेली शब्दयोजना अशी ः नॉईज मॉनिटरिंग मेकॅनिझम. या यंत्रणेची जोडणी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली जाईल. याचा हेतू ? ध्वनी प्रदूषण रोखणे. याचे कारण? अभी तो पार्टी शुरू हुई है..!

-सुरेश गुदले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT