मिलिंद ढमढेरे
सिंगापूर स्पर्धेतील विजेतेपद हे पी. व्ही. सिंधूसाठी आत्मविश्वास व मनोधैर्य उंचावणारे आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षा असेल. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये दोन पदके मिळवणारी सिंधू एकमेव भारतीय महिला आहे. आता सन 2024 मध्ये होणार्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे. जागतिक क्रमवारीमधील अवल दर्जाच्या खेळाडूंना कधी कधी निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागते. मात्र अशा कामगिरीने मनाचा संयम व समतोल ढळू न देता हे खेळाडू पुन्हा जिद्दीला अफाट कष्टाची जोड देत विजयपथावर येतात. दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणार्या पी. व्ही. सिंधू हिने पराभवाच्या मालिकेनंतर नुकतीच सिंगापूर खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आणि पुन्हा स्वतःला विजयपथावर नेले आहे. यंदाच्या मोसमात होणार्या राष्ट्रकुल क्रीडा व जागतिक अजिंक्यपद स्पर्धांच्या द़ृष्टीने तिचे हे यश अपेक्षा उंचावणारेच आहे.
जागतिक स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धांच्या मालिका नेहमीच आव्हानात्मक समजल्या जातात. काही वेळेला या स्पर्धेत ऑलिम्पिक किंवा जागतिक पदक विजेते खेळाडू नसतील, परंतु भावी काळातील काही महत्त्वपूर्ण स्पर्धांच्या द़ृष्टीने अशा मालिकांमध्ये विजेतेपद मिळवणे ही अन्य खेळाडूंच्या द़ृष्टीने आवश्यक गोष्ट असते. यंदाच्या मोसमात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि त्यापाठोपाठ होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा या दोन्ही स्पर्धा सिंधूसाठी आणि पर्यायाने भारतासाठी महत्त्वाच्या आहेत. हे लक्षात घेतले, तर सिंगापूर स्पर्धेतील विजेतेपद हे सिंधूसाठी आत्मविश्वास व मनोधैर्य उंचावणारेच आहे. त्याचप्रमाणे पुढे ढकलण्यात आलेली आशियाई क्रीडा स्पर्धा आता 2023 मध्ये होणार आहे. ही स्पर्धादेखील सिंधूच्या करिअरमधील आणखी एक प्रतिष्ठेची स्पर्धा असणार आहे. या सर्व स्पर्धांमध्ये तिचे यशापयश आपल्या देशासाठीदेखील महत्त्वाचे आहे. कारण अशा मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या देशाच्या पदकाच्या आशा कायमच एक-दोन खेळाडूंपुरत्याच मर्यादित राहिल्या आहेत.
सिंधू हिला यंदाच्या मोसमात विजेतेपदाने अनेक वेळेला हुलकावणी दिली आहे. सिंगापूर स्पर्धेपूर्वी हंगामात सईद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस खुली स्पर्धा या दोनच स्पर्धांमध्ये तिला अजिंक्यपद मिळवता आले होते. मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेकडे बहुतांश परदेशी खेळाडूंनी पाठ फिरवली होती. साहजिकच लुटुपुटुची लढाई ठरलेल्या या स्पर्धेत सिंधूने आपलीच सहकारी मालविका बनसोड हिला पराभूत केले होते. स्विस खुल्या स्पर्धेत तिने प्रभावी खेळ दाखवत विजेतेपदावर नाव कोरले. चीन, दक्षिण कोरिया, जपान इत्यादी देशांचे अनेक खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अनपेक्षित परंतु चमकदार कामगिरी करीत असतात. काही वेळेला फारसे परिचित नसलेले त्यांचे खेळाडूदेखील अजिंक्यपदावर नाव कोरीत बॅडमिंटन पंडितांना आश्चर्याचा धक्का देतात. यंदाच्या मोसमामध्ये सिंधूला काही वेळेला तिच्या मानांकन व अनुभवाच्या द़ृष्टीने नवख्या असलेल्या खेळाडूंकडून पराभव स्वीकारावा लागला होता. हे लक्षात घेतले, तर सिंगापूर स्पर्धेतील विजेतेपद हे तिच्यासाठी आणि पर्यायाने भारतासाठीही अपेक्षा उंचावणारे यश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आपल्या देशासाठी पदक मिळवण्याचे हुकमी व्यासपीठ मानले जाते. या महिन्याच्या अखेरीस यंदाची राष्ट्रकुल स्पर्धा सुरू होत आहे. यापूर्वी सिंधूने 2018 मध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताला सांघिक गटात विजेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता. मात्र या स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला होता.
सिंधूकडून यंदा वैयक्तिक क्रीडा प्रकारातही सोनेरी कामगिरीची अपेक्षा आहे. ऑगस्ट महिन्यातच होणारी जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ही सिंधूसाठी खडतर परीक्षाच असणार आहे. सहसा शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती टिकवण्याच्या द़ृष्टीने जागतिक विजेतेपदाच्या दावेदार असलेल्या खेळाडू आंतरराष्ट्रीय मालिकामधील तीन-चार स्पर्धांमध्ये भाग घेत नाहीत. अशा खेळाडू या विश्रांतीच्या काळात आपल्या कौशल्यातील उणिवा दूर करण्यावर अधिकाधिक भर देत असतात. जागतिक स्पर्धेत या खेळाडू पूर्ण तयारीनिशी सहभागी होत असतात. हे लक्षात घेतले, तर सिंधूलादेखील आतापासूनच या स्पर्धेची भक्कम तयारी करावी लागणार आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये दोन पदके मिळवणारी सिंधू ही एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. सन 2024 मध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतही पदक मिळवण्याची क्षमता तिच्याकडे आहे. आजपर्यंत भारताच्या एकाही खेळाडूला वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये ऑलिम्पिकची तीन पदके मिळवता आलेली नाहीत. साहजिकच, सिंधूकडून ऐतिहासिक कामगिरीची अपेक्षा आहे.
खरं तर जपान, चीन, इंडोनेशिया, स्पेन इत्यादी देशांच्या खेळाडूंच्या तुलनेत सिंधूला चांगली उंची आहे. त्याचा फायदा तिला परतीचे फटके व स्मॅशिंगचे बिनतोड फटके करण्यासाठी होऊ शकतो. नेटजवळ उडी मारून ड्रॉपशॉट्सचा खणखणीत फटकाही ती सहज मारू शकते. ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक विमलकुमार हे पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी प्रकाश पदुकोण अकादमीच्या कनिष्ठ व युवा गटातील खेळाडूंना मार्गदर्शन करीत होते. एक दिवस त्यांनी या खेळाडूंना सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावरील व्हॉलीबॉल क्रीडांगणावर बोलावले होते. तेथे या खेळाडूंना त्यांनी, व्हॉलीबॉलच्या नेटच्यावर हात जाईल अशा उंच उड्या मारण्यास सांगितले होते. उंच उडी घेऊन स्मॅशिंग किंवा परतीचा फटका मारला, तर त्यावर प्रतिस्पर्धी खेळाडूला उत्तर देणे अवघड जाते हाच त्यामागचा उद्देश होता. हे कौशल्य आत्मसात करणे सिंधूसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. सिंधूला काही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये तिच्यापेक्षा उंचीने कमी असलेल्या खेळाडूंकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. आघाडी घेण्याबरोबरच ती टिकवणेही महत्त्वाचे असते. आजपर्यंत अनेक वेळा सिंधूने महत्त्वाच्या स्पर्धांमधील अंतिम सामने आघाडी घेऊनही गमावले आहेत.
तीन-चार वेळा तर तिने भक्कम आघाडी असताना व एकतर्फी विजय मिळवण्याची संधी असतानाही पराभव ओढवून घेतला आहे. प्रतिस्पर्धी खेळाडू जेव्हा सिंधूच्या कोर्टमधील कॉर्नरजवळ प्लेसिंग करतात, अशा वेळी या प्लेसिंगचा अंदाज सिंधूला घेता आलेला नाही. या चुका टाळल्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विजेतेपद मिळवण्यासाठी भक्कम आत्मविश्वासाची आवश्यकता असते. अंतिम फेरीत सकारात्मक वृत्तीने चेहर्यावर आत्मविश्वास ठेवून खेळले पाहिजे, तसा आत्मविश्वास तिच्याकडून बरेच वेळेला दिसून आलेला नाही. सिंधूच्या चेहर्यावर खूप मानसिक दडपण असल्याचे दिसून येते. शटल बदलण्याचे निमित्त करून घाम व रॅकेट पुसण्याची कल्पकता तिने दाखवली पाहिजे.
प्रकाश पदुकोणनंतर ऑल इंग्लंड विजेतेपद मिळविणारा गोपीचंद तयार होण्यासाठी 21 वर्षांचा कालावधी जावा लागला. आजही पुरुष व महिला या दोन्ही गटांमध्ये ऑल इंग्लंडच्या विजेतेपदासाठी वाटच पाहावी लागत आहे. हे स्वप्न साकार होण्यासाठी मालविका बनसोड, पूर्वा बर्वे, आकर्षी कश्यप, तारा शहा या उगवत्या खेळाडूंकडे आशेने बघता येऊ शकते. बॅडमिंटनमध्ये करिअर करणार्या खेळाडूंची संख्या वाढत आहे. त्यांना प्रोत्साहन देणारे पालकही आहेत. अगदी लहान गटापासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटांकरिता, स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धांचीही संख्या वाढली आहे. सुदैवाने पदुकोण किंवा गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या खेळाडूंनी केवळ स्थानिक स्पर्धांपुरते आपले यश मर्यादित न ठेवता सतत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च यशाचे शिखर गाठण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. बॅडमिंटनमध्ये निर्माण झालेली 'सिंधू संस्कृती' ही ऑलिम्पिक पदकांची संस्कृती कशी होईल, याचा विचार बॅडमिंटन संघटकांनी केला पाहिजे.