रोगाचे नाव : अपस्मार
संबंधित व्याधी : पांडुता, कृमी, आर्तव, मनोविकार, मलावरोध, उन्माद.
स्रोत : अन्नवह, आर्तववह
चिकित्सा दिशा : शोधन, शमन, बस्ती, नस्म.
गुरूकुल पारंपरिक उपचार : मानसिक अपस्मारात सारस्वतारिष्ट दोन्ही जेवणानंतर चार चमचे समभाग पाण्याबरोबर घ्यावे. ब्राह्यीवटी रिकाम्या पोटी सकाळी आणि संध्याकाळी तीन गोळ्या आणि निद्राकरवटी सहा गोळ्या, झोपताना घ्याव्यात. पंचव्यघृत दोन चमचे दोन वेळा घ्यावे. वेखंड उगाळून त्यांचे गंध नियमितपणे एक चमचा घ्यावे. नाकात गाईचे तूप दोन थेंब नियमितपणे टाकावेत, वेगकालात कांद्याच्या रसाचे नस्य करावे. वेखंड, जटामांसी, उद आणि धूप यांची धुरी द्यावी. जंत आणि कृमी असल्यास कपिलादिवटी रात्री सहा गोळ्या आणि कृमीनाशक तीन-तीन गोळ्या सकाळी आणि संध्याकाळी रिकाम्या पोटी बारीक करून गरम पाण्याबरोबर घ्याव्यात. सतापाचा काढा चार चमचे दोन्ही जेवणांनंतर समभाग पाण्याबरोबर घ्यावा. वावडिंगसिद्ध दूध घ्यावे. आर्तव विकारामुळे असल्यास रिकाम्या पोटी कन्यालोहाटिवटी आणि कठपुतळी, प्रत्येकी तीन गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. दुबळेपणा असल्यास बदामकल्प द्यावा.
ग्रंथोक्त उपचार : कल्याणकघृत, शंखपुष्पी चूर्ण, ब्राह्याघृत, बृहत्वात चिंतामणी; स्मृतिसागर रस, उन्मादगज केसरी, बृहत्वात चिंतामणी.
विशेष दक्षता आणि विहार : आधुनिक वैद्यकाचे औषध रोगी सुधारेपर्यंत सोडू नये. झोपेच्या गोळ्या घेऊ नये. खिशात नेहमी कांदा ठेवावा, पंचगव्यघृत नेमाने घ्यावे.
पथ्य : वेळेवर जेवळ आणि झोप सायंकाळी लवकर आणि कमी जेवण हे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळावेत. गायीचे दूध, मूग, दुधीभोपळा, कारले, शेवगा, जून कोहळा, पडवळ, दोडका, कोथिंबीर, आवळा, गोड ताक, नारळाचे पाणी, डाळिंब, जुने हातसडीचे तांदूळ वापरावेत.
कुपथ्य : अतिश्रम टाळावेत. शक्तिपात, शुक्रक्षय कटाक्षाने टाळावा. तिखट, आंबट, खारट मसालेदार पदार्थ टाळावेत.
रसायनचिकित्सा : शतावरी कल्प, घृत, अश्वगंधारिष्ट, शंकपुष्टी सायरप, पंचगव्य घृत.
योेग आणि व्यायाम : सूर्यनमस्कार नियमित घालणे, शवासन करावे, प्राणायाम करणे. नाक आणि डोळ्यांत तूप टाकावे. शतधौतघृताचे पादपूरण, निरूहबस्ती, वमन.
अनुपर्भचिकित्सा : वेखंडावे गंध, पंचगव्य घृत, ब्राह्मी रस नेमाने घ्यावा.
रात्री बदाम भिजत टाकून सकाळी वाटून दुधाबरोबर घ्यावा.
वैद्य विनायक खडीवाले