अपडेट्स

Washim Crime : वाशिममध्ये खळबळ: मित्रांसोबत आलेल्या वर्ध्यातील तरुणाचा संशयास्पद मृत्यू; घातपात की अपघात?

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : कामनिमित्ताने मित्रांसोबत वाशिम येथे आलेल्या ३४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १०) पहाटे उघडकीस आली. आशिष बाबाराव शेळके (रा. एकलारा, ता. आर्वी, जि. वर्धा) असे मृतकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, हा घातपात आहे की अपघात, यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष शेळके हा त्याचे मित्र विनोद फटिंग, अजय वानखेडे, गणेश भगत आणि सचिन राऊत यांच्यासोबत वाशिम शहरातील एका ले-आऊटच्या कामासाठी आला होता. मंगळवारी (दि. ९) काम आटोपून हे पाचही जण सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शहरातील शिवाजी चौक परिसरातील 'हॉटेल अलख लॉजिंग'मध्ये मुक्कामासाठी आले होते.

हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा सर्वजण नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यांनी हॉटेलच्या कॉमन डॉर्मेट्रीमध्ये मुक्काम केला. मात्र, बुधवारी पहाटे जेव्हा मित्र जागे झाले, तेव्हा आशिष बेडवर नव्हता. शोधाशोध केली असता, हॉटेलला लागून असलेल्या इमारतीच्या परिसरात आशिष मृतावस्थेत आढळून आला.

गूढ कायम

रात्री एकत्र झोपलेले असताना आशिष पहाटे उठून टेरेसवर कसा गेला आणि तिथून तो खाली कसा पडला, हे मोठे गूढ निर्माण झाले आहे. ही घटना अपघात आहे की यामागे काही घातपात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, वाशिम शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT