अपडेट्स

Goa Tribal Vision 2037: "'गोवा ट्रायबल व्हिजन 2037' हा विकासाचा नवा मार्गदर्शक आराखडा!; मंत्री रमेश तवडकर यांचा पुढाकार"

Goa Tribal Vision 2037: राज्याच्या स्वयंपूर्णतेसाठी आदिवासी स्वयंपूर्ण व्हायला हवा!

पुढारी वृत्तसेवा

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकसित भारताचा, तर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा 'स्वयंपूर्ण गोवा'चा संदेश

  • 'गोवा ट्रायबल व्हिजन २०३७' ला हातभार लावूया

उतोर्डा : प्रभाकर धुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 'स्वयंपूर्ण गोवा'चा संदेश दिला आहे. मात्र, गोवा स्वयंपूर्ण होण्यासाठी आदिवासी स्वयंपूर्ण व्हायला हवा, असे मत विधानसभेचे सभापती डॉ. गणेश गावकर यांनी मांडले.

गोव्यातील अनुसूचित जमाती विकासासाठी 'गोवा ट्रायबल व्हिजन २०३७' या विषयावर एकदिवसीय परिषद २२ जुलैला प्लॅनेट बॉलीवूड बीच रिसॉर्ट, उतोर्डा (सासष्टी) येथे आयोजित केली होती. परिषदेचे उद्घाटन दीपप्रज्वलन आणि आदिवासी कल्याणमंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्या स्वागतपर भाषणाने झाले.

सभापती डॉ. गणेश गावकर, आमदार गोविंद गावडे, माजी मंत्री तथा एसटी समाजाचे नेते प्रकाश वेळीप, गोवा राज्य अनुसूचित जमाती वित व विकास महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव मेंग गावकर, गोवा अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष रवींद्र गावकर आदी उपस्थित होते.

डॉ. गावकर म्हणाले, मंत्री तवडकर यांच्या पुढाकाराने आयोजित केलेली परिषद हा लँडमार्क आहे. टेनन्सी, मुंंडकार यांचे प्रश्न, आदिवासी लोकांसाठी निधी, एससी, एसटी आरक्षण, सरकारी कार्यालयांतील नोकरीमधील अनुशेष, आरक्षण आदींबाबत यावर या परिषदेत चर्चा होईल. गावडा, कुणबी, वेळीप आणि धनगर या आदिवासी लोकांनी जे पिढ्यानपिढ्या जपले ते शाश्वत ठेवण्यासाठी चर्चा व्हायला हवी.

आदिवासी कल्याण मंत्रालयाने मंत्री तवडकर यांच्या नेतृत्वाखाली विचार मांडण्यासाठी पहिलीच परिषद घेतली ही चांगली बाब आहे. यावर 'गोवा ट्रायबल व्हिजन २०३७' अंतर्गत जो व्हिजन डॉक्युमेंट तयार होणार आहे, त्याला सर्वांनी हातभार लावूया, असेही डॉ. गावकर यांनी नमूद केले.

मंत्री तवडकर म्हणाले, गोव्याच्या भूमिपुत्रांची काळजी घेण्याची जबाबदारी आदिवासी खाते आणि सरकारची आहे. या खात्याचे स्वतंत्र बजेट आहे. सरकारमध्ये वेगवेगळ्या खात्याच्या १२ टक्के निधी आहे. मी आदिवासी समाजाचा आहे आणि मंत्रीही आहे. त्यामुळे विकासाची अंमलबजावणी ही माझी जबाबदारी आहे.

कित्येक विद्वान, तांत्रिक माहितगार आमच्या समाजात आहेत. त्यांची बुद्धिमत्ता आपल्या समाजबांधवांसाठी दिली तर आदिवासींचा विकास नक्की आहे, असा विश्वास तवडकर यांनी व्यक्त केला. आमदार गोविंद गावडे यांनी सांगितले की, ट्रायबल व्हिजन २०३७ कसे हवे यावर विचारमंथन आणि प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी परिषदेचे आयोजन केले आहे.

प्रत्येक समाजाची ओळख म्हणजे त्या समाजात किती डॉक्टर, इंजिनिअर, ॲडव्होकेट, निःस्वार्थी राजकारणी आहेत ही असते. या सर्वांनी समाजासाठी वेळ, आर्थिक मदत द्यायला हवी, सरकारी कर्मचारी जे आहेत, त्यांनी फूल ना फुलाची पाकळी देण्याची जबाबदारी सर्वांनी घेण्याची गरज आहे.

समाजासाठी कृष्णा बांदोडकर यांच्यापासून अनेक समाजधुरीण घडले. बुद्धिमान लोकांनी स्वार्थ न पाहता त्याग केल्यास समाजाची जडणघडण शक्य आहे. मागे काय घडले ते न पाहता इतिहास लिहिण्यासाठी स्वतः प्रयत्न करा. दुसरा कोणी इतिहास लिहिणार नाही आणि लिहिलाच तर तो योग्य असेलच, असे नाही. त्यामुळे आपला इतिहास आपणच लिहायला हवा.

मी समोर स्पष्ट बोलणारा आहे. वंचित पददलितांचा मी आवाज बनून काम करतो. आपला समाज २०३७ पर्यंत प्रगतीच्या शिखरावर जाणार आहे. मात्र, ते ध्येय गाठण्यासाठी आतापासून प्रयत्न करूया, असे आवाहन गावडे यांनी केले.

या एकदिवसीय परिषदेत राज्याच्या आदिवासी विकासाचा दीर्घकालीन आराखडा तयार करण्यासाठी विविध तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी सहभागी झाले होते. मंत्री तवडकर यांच्या हस्ते सभापती डॉ. गावकर आणि आमदार गावडे यांचा, तर मंत्री तवडकर यांचा आमदार गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले.

आर्थिकदृष्ट्या विकासासाठी नियोजन : तवडकर

मंत्री रमेश तवडकर म्हणाले की, आदिवासींचा सामाजिक विकास आवश्यक आहे. मागासलेपणाची छाप होती, ती पुसली जाऊन समान सामाजिक स्थान यायला हवे. त्यासाठी या परिषदेचे आयोजन आहे.

आर्थिकदृष्ट्या विकासासाठी नियोजन हा परिषदेचा दुसरा मुद्दा आहे. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक नेतृत्व निर्माण व्हायला हवे, विचार करण्यासाठी ही परिषद आहे, असे तवडकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT