अपडेट्स

SpiceJet : स्पाइस जेटच्या दिल्ली-पुणे विमानात प्रचंड उष्णता; प्रवासी अस्वस्थ, ७ तासांच्या उशिरानंतर पर्यायी विमानाने उड्डाण

रात्री ९.४५ वाजता उडणारे विमान पहाटे ५ वाजता उडाले आणि ७ वाजता पुण्यात दाखल झाले.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीहून पुण्याकडे उड्डाण घेणाऱ्या स्पाइस जेट कंपनीच्या विमानामध्ये बिघाड झाल्याने मंगळवारी रात्री प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या त्रासाला कंटाळून प्रवाशांनी विमानतळावरच ठिय्या मांडला. जवळपास ७ तासांच्या उशिरानंतर पर्यायी विमानाची सोय करण्यात आली. रात्री ९.४५ वाजता उडणारे विमान पहाटे ५ वाजता उडाले आणि ७ वाजता पुण्यात दाखल झाले.

नेमके काय घडले?

स्पाइसजेट कंपनीचे एस जी १०५ हे विमान मंगळवारी रात्री ९.४५ वाजता दिल्लीहून पुण्याला जाणार होते. विमानात प्रवासी बसत होते. या प्रवाशांमध्ये आबालवृद्धांसह लहान मुलेदेखील होती. विमानात बसल्यानंतर आतील तापमान प्रचंड वाढले होते. हे तापमान एवढे वाढले की प्रवाशांना ते सहन होत नव्हते; सर्व जण घामाने ओलेचिंब झाले होते. लोकांना श्वास घ्यायलाही खूप जास्त त्रास होऊ लागला. तशाच परिस्थितीत विमान रनवेवर घेण्यात आले, परंतु शेवटी प्रवाशांच्या विरोधामुळे ते मागे घेण्यात आले. दोन-तीन तास म्हणता म्हणता तब्बल ७ तासांच्या उशिरानंतर पर्यायी विमानाने उड्डाण केले.

या विमानातील प्रवासी लेशपाल जवळगे 'पुढारी'शी बोलताना म्हणाले, "विमानातील परिस्थिती पाहता सर्व प्रवाशांनी आरडाओरडा करून विमान उडवण्यास नकार दिला, तेव्हा कॅप्टन आणि इतर कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत प्रवाशांना गप्प बसवण्यासाठी धमकावले. त्यानंतर खरोखरच विमानात बिघाड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा प्रकारची अत्यंत वाईट सेवा देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचे पाप स्पाइसजेट करत आहे. यामध्ये केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष देऊन या स्पाइसजेट कंपनीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे."

स्पाइसजेटने व्यक्त केली दिलगिरी या संपूर्ण घटनाक्रमावर स्पाइसजेट एअरलाइन्सच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. प्रवक्त्यांनी सांगितले की, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दिल्लीहून पुण्याकडे जाणारे स्पाइसजेटचे एसजी १०५ विमान उड्डाणाच्या काही वेळापूर्वी तांत्रिक अडचणीला सामोरे गेले.

त्यानंतर पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आणि या विमानाने पुढे पुण्याकडे उड्डाण केले. या प्रकारामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल स्पाइसजेटने मनापासून खेद व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT